एक पैसा घेतल्याचा पुरावा द्या, राजकारण सोडेन : आ. शंभूराज देसाई

Shamburaj Desai
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

आम्ही कोणतेही बंड केलेले नाही, तर उठाव केला. यासाठी कोणत्याही प्रकारचा एक पैसा घेतल्याचा पुरावा द्यावा, राजकारण सोडू. बाहेर 50 कोटी घेतल्याच्या काही चर्चा सुरू आहेत, याला महत्व नाही. तसेच आम्ही शिवसेनेत आहोत, शिवसेना सोडलेली नाही, असे शिवसेनेचे शिंदे गटाचे आ. शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.

भाजप- शिंदे गटाने सत्ता स्थापन केल्यानंतर सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेल्या 15 दिवसात कशा पध्दतीने सरकार स्थापन झाले, त्याचबरोबर नविन सरकारची भूमिका काय याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. आज आ. शंभूराज देसाई हे पाटण विधानसभा मतदार संघात नियोजित दाैऱ्यावर निघाले होते. तसेच ते दुपारी पाटण तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1236542190486171

आ. शंभूराज देसाई म्हणाले, महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना पक्षप्रमुखांचा आदेश म्हणून मान्य केला होता. मात्र, गेल्या अडीच वर्षात आमची कुचुंबणा झाली. अनेकदा आम्ही तक्रारी केल्या, मात्र त्या ऐकल्या न गेल्याने आम्ही उठाव केला. त्यामुळे आता शिवसेना- भाजपा युतीचे सरकार आले आहे. महाराष्ट्र सरकारच्या पाठीशी केंद्र सरकार खंबीरपणे उभे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि जे. पी. नड्डा यांनी सांगितले आहे.

सातारा जिल्ह्याने मागायचे अन् मुख्यमंत्र्यांनी द्यायचे

शरद पवार सांगताहेत लागणार निवडणुका म्हणजे मध्यवधी निवडणुका लागणार नाही. सातारा जिल्ह्याचे सुपुत्र हे सध्याचे मुख्यमंत्री आहेत. जिल्ह्यातील माणूस मोठा होत असेल तर आम्ही त्यांना साथ दिली. त्यामुळे आता जिल्ह्याने मागायचे अन् मुख्यमंत्र्यांनी द्यायचे. गेल्या अडीच वर्षात अनेक कामे प्रलंबित आहेत. तसेच विकासकामांसाठी निधीची कमतरता होती, ती आता जिल्ह्याच्या सुपुत्राच्या रूपाने भरून निघेल, असे आ. शंभूराज देसाई म्हणाले.

विद्यमान आमदारापेक्षा पडलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला जादा निधी

जी कामे शिवसेनेचा आमदार म्हणून मी आणायचो. ती कामे पालकमंत्र्याच्या माध्यमातून आम्ही आणली, म्हणून बॅनरबाजी करून आपण आणली म्हणायचे. आमच्या कामात राष्ट्रवादीच्या नेत्याकडून वेळोवेळी हस्तक्षेप होत आहे. राष्ट्रवादीच्या पडलेल्या उमेदवाराला विद्यमान आमदारापेक्षा जादा निधी दिला जात होता, असे म्हणत सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यावरही टीका आ. शंभूराज देसाई यांनी केली.