कोल्हापूर | गोकुळमधील सत्तातरांनंतर आज पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. विरोधकांनी बसण्यासाठी खुर्च्या नाहीत म्हणत सभेतून बाहेर पडत समांतर सभा घेत घोषणाबाजी केली. तर विरोधकांना सभा होवू द्यायची नव्हती, असा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला आहे. गोकूळची 60 वी सर्वसाधारण सभा अखेर गोंधळात वादळी ठरली.
या सभेला माजी मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील उपस्थित आहेत. विरोधी सभासद येण्याआधी सभागृह कसे भरले, असा सवाल संचालिका शौमिका महाडिक यांनी केला आहे. तसेच प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय सभा सुरू होऊ देणार नाही, असा पवित्रा महाडिक यांनी घेतल्याने सभेत प्रचंड गोंधळ निर्माण झाला. विरोधी गटाचे सभासद येण्यापूर्वीच हॉल भरल्याने त्यांना शेवटच्या रांगेत बसावे लागले. शौमिका महाडिक ठरावधारकांसह हॉलमध्ये पोहोचताच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विरोधी सभासदांनी प्रश्न कसे विचारायचे? त्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या. विरोधी सभासद येण्याआधीच सभागृह कसे भरले? असा सवाल महाडिक यांनी उपस्थीत केला. गोकूळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या अध्यक्षीय भाषणावेळी शाैमिका महाडिक यांनी गोंधळातच अनेक प्रश्न विचारले. परंतु ऐकू येत नसल्याने सभागृहाबाहेर येत समांतर सभा घेतली. तर विरोधकांना सभा होवू द्यायची नव्हती, असे म्हणत महाडिक गटाला हसन मुश्रीफ यांनी टोला लगावला.
गोकूळच्या सभेला 125 पोलिसांचा बंदोबस्त ः- गोकुळच्या सैनिक दरबार हॉलमध्ये सुरू असलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सभास्थळासह परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या सभेसाठी 2 पोलिस उपअधीक्षक, 5 पोलिस निरीक्षक, 12 सहायक निरीक्षक, 71 पोलिस अंमलदार, 22 महिला पोलिस, वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक शाखेचे 15 पोलिस, आरसीपी, स्ट्रायकिंग फोर्स असा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याबाबत पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.