औरंगाबाद : अडीच महिन्यांच्या खंडानंतर एसटी महामंडळाच्या बस सेवेला 1 जून पासून सुरुवात झाली असून गुरुवारी औरंगाबाद विभागातून पुणे, धुळे, नाशिक, जळगाव, जालना आदी मार्गावर सुमारे 26 बसेस धावण्याची माहिती एसटी महामंडळाच्या सूत्रांकडून मिळाली.
एसटी महामंडळाची बस सेवा अत्यावश्यक सेवेत असली तरी कोरोनाच्या दहशतीमुळे घराबाहेर पडणे व प्रवास करणे टाळले होते. यामुळे एसटीला ही प्रवासी सेवा बंद करावी लागली. तब्बल अडीच महिन्याच्या विश्रांतीनंतर एक जून पासून लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट दिल्याने अनेक प्रवासी कामानिमित्त विविध ठिकाणी जाण्यासाठी एसटी कडे वळले आहेत. त्यामुळे 1 जून पासून एसटीने धुळे, पुणे, जळगाव, नाशिक, जालना आदी मार्गावर प्रवासी सेवा सुरू केली आहे.
पहिल्या दिवशी केवळ 14 ते 15 बसेस विविध मार्गावर धावल्या. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी थोडा प्रतिसाद वाढल्याने 26 गाड्या विविध मार्गावर सोडण्यात आल्या. हळूहळू प्रवासी संख्येत वाढ होण्याची शक्यता असून प्रवासी संख्या वाढताच विविध मार्गावर आणखी बस सेवा देण्यात येईल अशीही माहिती सूत्रांनी दिली.