सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
राज्यातील मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वर व पाचगणीतील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे या दोन्ही शहरांना पाणी पुरवठा करणारे वेण्णालेक भरले आहे. मुसळधार पावसामुळे पाचगणी व महाबळेश्वरची जीवनवाहिनी असलेल्या वेण्णा लेकच्या सांडव्यावरुन पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे शहरवासियांचा पाण्याचा प्रश्न आता सुटलेला आहे.
तौक्ते चक्रीवादळानंतर आजपर्यंत महाबळेश्वर व पाचगणी या ठिकाणी पाऊस कमी-अधिक प्रमाणात पडत आहे. पावसाने महाबळेश्वरचे निसर्गवैभव अधिकच खुलून दिसु लागले आहे. पावसासोबतच धुक्याची शाल पांघरलेले महाबळेश्वर प्रत्येकाचेच मन मोहून टाकत आहे. महाबळेश्वरमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोसळणार्या धुवाँधार पावसाने महाबळेश्वरची जीवनवाहिनी वेण्णालेक तलाव तुडुंब भरला असून रविवारी दुपारी तीनच्या सुमारास वेण्णालेकच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले
दरवर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तर, यावर्षी सहा वर्षानंतर जून महिन्यातच वेण्णालेक तुडुंब भरून वाहू लागले आहे. याच वेण्णालेकमधून महाबळेश्वर व पाचगणी या दोन्ही पर्यटनस्थळांना पाणी पुरवठा केला जातो. वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.