मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी ! मेट्रो-2B मार्गिका लवकरच सेवेत, 16 एप्रिलपासून चाचण्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबईतील प्रवाशांसाठी आणखी एक मेट्रो मार्गिका लवकरच उपलब्ध होणार असून, मेट्रो-2B प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील चाचणी बुधवारपासून (१६ एप्रिल) सुरू होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) उभारत असलेल्या मंडाळे डेपो ते डायमंड गार्डन (चेंबूर) या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून, आता या मार्गावर ट्रायल रनसाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

२३ किलोमीटरचा मेट्रो मार्ग

एमएमआरडीएच्या अंधेरी पश्चिम ते मानखुर्द-मंडाळे या एकूण २३ किलोमीटर लांबीच्या मेट्रो-2B मार्गिकेचा प्रकल्प टप्प्याटप्प्याने पूर्ण होणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्याचा समावेश मंडाळे ते डायमंड गार्डन पर्यंत असून, येथील चाचणीसाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यात आल्या आहेत. या मार्गिकेमुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीची अधिक मजबूत आणि जलद सुविधा उपलब्ध होणार आहे.

मेट्रो चाचणीमध्ये काय असणार?

  • पूर्ण वजनासह गाड्यांची चाचणी
  • सिग्नलिंग आणि ट्रॅक्शन प्रणालींची कार्यक्षमता
  • सुरक्षेची तांत्रिक तपासणी

या प्राथमिक चाचणीनंतर आरडीएसओ (रेल्वे डेव्हलपमेंट स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन) मेट्रो गाड्यांची स्वतंत्र चाचणी करेल. अंतिम फेरीत कमिशन ऑफ मेट्रो रेल सेफ्टी (CMRS) मार्फत तपासणी होईल, त्यानंतर प्रवाशांसाठी मेट्रो सेवा सुरू करण्यात येईल.

पहिल्या टप्प्यातील स्थानके

  1. मंडाळे डेपो
  2. मानखुर्द
  3. बीएसएनएल मेट्रो
  4. शिवाजी चौक
  5. डायमंड गार्डन

संपूर्ण मार्गिका कधी होणार सुरू?

डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण मेट्रो-2B मार्गिका प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. सध्या डायमंड गार्डन ते डी. एन. नगर या उर्वरित टप्प्याचे काम प्रगतीपथावर आहे.

मेट्रो 2B कारशेडची प्रगती

  • मंडाळे कारशेडचे ९७% काम पूर्ण
  • विद्युतीकरण पूर्ण, ८ एप्रिलपासून कारशेडमध्ये विद्युत पुरवठा सुरू
  • हा मार्ग पश्चिम/पूर्व द्रुतगती मार्ग, पश्चिम/मध्य रेल्वे, मोनोरेल, मेट्रो-2A, मेट्रो-3 व मेट्रो-4 मार्गांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे
  • मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर मेट्रो 2B ही एक महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा ठरणार आहे. चेंबूर परिसरातील प्रवाशांना याचा सर्वाधिक लाभ होणार असून, हा मेट्रो मार्ग वाहतूक कोंडी कमी करण्यासह वेळेची बचत करेल. एमएमआरडीएचे उद्दिष्ट डिसेंबरअखेर पहिला टप्पा प्रवाशांसाठी खुला करण्याचे असून, ही मुंबईच्या मेट्रो नेटवर्कमधील आणखी एक महत्त्वाची भर ठरणार आहे.