औरंगाबाद – कोरोना व लॉकडाऊन मुळे मागील दीड वर्षापासून बंद असलेली रेल्वेची पॅसेंजर सेवा आता हळूहळू पूर्ववत करण्यात येत आहे. कोरोना चा प्रादुर्भाव कमी झाल्यावर रेल्वे प्रशासनाच्या वतीने बहुतांश रेल्वे पूर्ववत चालू करण्यात आल्या आहेत. परंतु त्या सर्व रेल्वेमध्ये प्रवाशांना आधी आरक्षण काढूनच प्रवास करावा लागत आहे. आता कोरोना चा प्रादुर्भाव जवळपास संपत आल्याने सर्वसामान्यांसाठी पॅसेंजर रेल्वे सुरू करण्यात याव्यात अशी मागणी प्रवासी वर्गातून करण्यात येत आहे. ही मागणी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने मागील महिन्यात नांदेड ते रोटेगाव दरम्यान एक अनारक्षित डेमो रेल्वे सुरू केली. परंतु, अजून इतरही पॅसेंजर रेल्वे सुरू करण्यात यावे या या मागणीवर प्रवासी ठाम राहिल्याने आता दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने काचिगुडा ते रोटेगाव दरम्यान 15 नोव्हेंबर पासून दररोज डेमो रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठ्याप्रमाणावर दिलासा मिळणार आहे.
दक्षिण मध्य रेल्वेने एका परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे 15 नोव्हेंबर पासून गाडी संख्या 07571 काचीगुडा ते रोटेगाव डेमो रेल्वे काचीगुडा रेल्वे स्थानकावरून दररोज सकाळी 4 वाजून 50 मिनिटांनी सुटेल. त्यानंतर नांदेड येथून दुपारी साडेबारा, परभणी येथून 2 वाजून 10 मिनिटांनी सुटेल. त्यानंतर औरंगाबाद येथे सायंकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी येईल पुढे रोटेगाव ला हि रेल्वे त्याच दिवशी रात्री साडेआठ वाजता पोहोचेल.
परतीच्या प्रवासात ही गाडी संख्या 07572 शेगाव ते काचीगुडा 15 नोव्हेंबर पासून रोटेगाव रेल्वे स्थानकावरून दररोज सकाळी 5 वाजून 40 मिनिटांनी सुटेल. तर औरंगाबाद येथून सकाळी सात वाजता सुटेल. पुढे परभणी येथून सकाळी साडेअकरा, नांदेड येथून दुपारी एक वाजता सुटून रेल्वे काचिगुडा येथे त्याच दिवशी रात्री पावणे अकरा वाजता पोहोचेल.