औरंगाबाद | महापालिकेत गेल्या दोन वर्षांपासून नोकरभरतीची चर्चा सुरू आहे. पण त्यासाठी आकृतिबंध व सेवाभरती नियम मंजूर होणे गरजेचे होते. आकृतिबंध मंजूर झाल्याने एक टप्पा पूर्ण झाला असून, सेवा भरती नियमांना ऑगस्टअखेर मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान पुढील दोन महिने कोरोना संसर्ग वाढला नाही तर महापालिकेतील नोकरभरती डिसेंबरअखेर पूर्ण होईल, असे महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले आहे.
महापालिकेतील महत्त्वाच्या पदांवरील अनेक अधिकारी निवृत्त झाले आहेत. त्यामुळे जुन्या आकृतिबंधातील मंजूर पदानुसार सध्या साडेपाचशेपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. दरम्यान, राज्य शासनाने महापालिकेचा नवा आकृतिबंध मंजूर करताना ९५३ पदांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे महापालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या पाच हजार ७१६ एवढी झाली आहे. महापालिका एक हजारापेक्षा जास्त जणांची नोकरभरती करू शकते.
पण सेवा भरती नियमांची फाईल मंजूर झाल्यानंतरच. यासंदर्भात महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले, की ऑगस्टच्या अखेरीस शासनाकडून सेवाभरती नियमांना मंजुरी मिळू शकते. त्यानंतर पुढील दोन महिने सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये कोरोना संसर्ग वाढला नाही तर महापालिकेला नोकरभरतीची तयारी करता येईल. आवश्यकतेनुसार कशी पदे भरता येईल, याची तयारी करून डिसेंबर अखेरपर्यंत नोकरभरती केली जाऊ शकते, अशी शक्यता पांडेय यांनी व्यक्त केली.
खर्चाची मर्यादा पाळावी लागणार-
सेवा भरती नियम मंजूर झाल्यानंतर महापालिकेतील नोकर भरतीची प्रक्रिया सुरू होईल. मात्र राज्य शासनाने आस्थापनेवरील खर्च ३५ टक्क्यांच्या पुढे जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशी अट टाकली आहे. त्यामुळे नोकर भरती करताना आस्थापना खर्चाची मर्यादा पाळूनच करावी लागणार आहे.