औरंगाबाद – लेन्सकार्ट कंपनीच्या स्टोअरमधून ग्राहकांनी खेरदी केलेल्या साहित्याचे पैसे कंपनीच्या खात्यावर जमा न करता क्यूआर कोडव्दारे परस्पर वळवण्यात आले. एजन्सीला तब्बल 93 लाख 144 रुपयांचा चुना लावणाऱ्या दोघांपैकी एकाला सायबर पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. दामोधर वामन गवई (वय 35, रा. लक्ष्मी कॉलनी, मुळ रा. पेठ ता. चिखली जि. बुलडाणा) असे आरोपीचे नाव आहे. त्याला 20 डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एस. डी. कुऱ्हेकर यांनी शनिवारी दिले आहेत.
शमिका ऑरगॅनिक इंडिया या कंपनीचे संचालक शिरीषकुमार पगारे (रा. वसुंधरा कॉलनी, एन-7 सिडको) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, फिर्यादीने कंपनीमार्फत लेन्सकार्ट सोल्युशन्स या गॉगल्स व चष्मे विक्री करणाऱ्या कंपनीची औरंगाबाद, नाशिक, ठाणे या तीन ठिकाणी फ्रेंचायजी घेतलेली आहे. 4 नोव्हेंबर 2019 रोजी लेन्सकार्ट स्टोअरला मॅनेजर म्हणून मयूर देशमुख (रा. स्वामीसमर्थ अपार्ट, सातारा परिसर) याची नियुक्ती करण्यात आली होती. तर दामोदर गवई याची सेल्समन नियुक्ती केली होती. 10 नोव्हेंबररोजी लेन्सकार्टचे एरिया मॅनेजरने फोन करून फिर्यादीला ग्राहकांना विक्री केलेल्या साहित्याच्या पेमेंटची काही रक्कम कंपनीकडे जमा झाली नसल्याचे सांगितले.
दरम्यान फिर्यादी हे कामानिमित्त ओमान मध्ये असल्याने त्यांनी भाऊ सुशिल पगारे याला चौकशी करण्याचे सांगितले. सुशीलने चौकशी केली असता, आरोपींनी ग्राहकांना कार्ड स्वाईप मशीन खराब झाल्याचे सांगत ग्राहकांनी खरेदी केलेल्या साहित्याचे सुमारे 93 लाख 144 हजार रुपये मोबाइलवरील क्यूआर कोडव्दारे आपल्या खात्यावर वळवल्याचे समोर आले. दरम्यान घोटाळा उघड होण्यापूर्वी म्हणजे 9 नोव्हेंबर रोजी मयूर देशमुख याने आजोबाचे निधन झाल्याचे सांगत स्टोअर सोडून दिले होते. याबाबत फिर्यादीने आरोपी मयूरकडे चौकशी केली असता त्याने कबुली दिली. तसेच गुन्ह्यातील चोरलेल्या रकमेपैकी 93 हजार रुपये फिर्यादीच्या खात्यावर जमा केले. या प्रकरणात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास करून आरोपी दामोदर गवई याला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयात सहायक सरकारी वकील अर्चना लाटकर यांनी युक्तिवाद केला.