संगाली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
भाजपचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे तासगावच्या सभेला आले. मात्र या सभेकडे तासगावकरांनी पाठ फिरवली. ही सभा फ्लॉप गेली. त्यामुळे संतापलेल्या अमित शाह यांनी खासदार पाटील यांची खरडपट्टी केली. शिवाय संजय पाटील हे सांगलीत तिसर्या स्थानावर गेलेत. त्यांचा विचार आता सोडून द्या, असा ‘रिपोर्ट’ त्यांनी दिल्लीत पक्षाला दिला आहे असे खळबळजनक वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी केले. मणेराजुरी येथील जाहीर सभेत ते बोलत होते.
माझ्या प्रचाराच्या धडाक्याने व लोकांच्या पाठींब्यामुळे संजय पाटील यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाला तासगावात सभेला आणावे लागते. मी माझ्या होम ग्राऊंडवर आटपाडीला अद्याप गेलोही नाही. मात्र खासदारांना तासगावात राष्ट्रीय अध्यक्षाची सभा घ्यावी लागते, ही तुमची लायकी असा टोला पडळकरांनी यावेळी बोलताना लगावला.
माजी गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्या पत्नी आमदार सुमनताई पाटील यांच्यावर ते दादागिरी करीत आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीत त्या ज्या घरात बसल्या होत्या, त्या घरावर गुंड आणून संजय पाटील यांनी दगडफेक करायला लावली. एका अबला महिला आमदारावर दगडफेक करताना आणि पोलिसांवर हल्ले करताना त्यांना लाज कशी वाटली नाही असा सवालही पडळकरांनी यावेळी उपस्थित केला.