पवारांमुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅंन्सर; पडळकरांची जळजळीत टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आमच्या हातात सत्ता द्या, तुम्हाला महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदललेला दिसेल असं विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एका जाहीर सभेत केलं होते, यावरून भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर टीका केली आहे. ५०-६० वर्षे पवारांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सत्ता होती. त्यावेळी त्यांनी फक्त महाराष्ट्र लुटायचंचं काम केलं आहे, पवारांमुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅंन्सर झाला आहे अशा शब्दात गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे.

पडळकर यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून व्हिडिओ शेअर करत पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवार म्हणतात सत्ता हातात द्या महाराष्ट्राचा चेहरा बदललेला दिसेल. पण मी त्यांच्या अर्ध्या विधानाशी सहमत आहे. महाराष्ट्रचा चेहरा बदलण्याची आवश्यकता देवेंद्रजींनी पूर्ण केली आहे. पवारांमुळे फक्त महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅंन्सर झाला आहे. ५०-६० वर्षे पवारांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सत्ता होती. त्यावेळी त्यांनी फक्त महाराष्ट्र लुटायचंचं काम केलं आहे “छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला आणि हिंदुस्थानला दिलेली तेजाची झळाळी एकट्या पवारांमुळे हरवली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेला अठरापगड जातींचा आणि १२ बलुतेदारांचा महाराष्ट्र ५० वर्षे पवारांनी स्वत:ची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून चालवला. पवार अँड पवार प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आता पवार अँड सुळे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झालाय अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.

जातीजातींमध्ये वाद लावायचा, जातीजातींना झुलवत ठेवायचं आणि प्रस्थापितांची घरं भरण्याचं काम सुरु होतं. त्यामुळे याला कंटाळून महाराष्ट्रातील लोकांनी २०१४ मध्ये परिवर्तन केलं. पवारांचा शासनकाळ हा महाराष्ट्राच्या इतिहासाची फक्त काळी पानं आहेत. त्यांनी फक्त भ्रष्टाचार आणि जातीवाद केला. लोकांच्यात भांडणं लावली. माझी त्यांना विनंती आहे की,आता तुम्ही निश्चिंत आणि निवांत राहा. हरिनामाचा जप करा म्हणजे तुमच्या डोक्यात पुण्य काम करण्याची ईच्छा जागृत होईल. देवेंद्र फडणवीसांनी २०१४ मध्ये आणि आता एकनाथ शिंदेंसोबत महाराष्ट्राला देशात परकीय गुंतवणूकीत पहिल्या क्रमांकावर आणला आहे.

आज महाराष्ट्रातील युवकांच्या हाताला काम मिळत आहे,नवनवीन उद्योग महाराष्ट्रात येत आहेत, महिलांचे सक्षमीकरण होत आहे. पण हीच महाराष्ट्राची प्रगती पवारांना कुठेतरी खुपते आहे. आज महाराष्ट्राला सर्वसमावेशक विकासाचा चेहरा मिळाला आहे. तो बदलवून पवारांना पुन्हा महाराष्ट्रात पुन्हा जातीवाद निर्माण करायचा आहे का? पवारांना महाराष्ट्राला दुबळं करायचं आहे का? दलित ओबीसी अत्याचाराचे नवे अध्याय लिहायचे आहेत का?” असा सवाल गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांना केला आहे.