हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा काल वाढदिवस पार पडला. संपूर्ण देशभरातून शरद पवार याना वाढदिवसाच्या शुभेच्या देण्यात आल्या. तत्पूर्वी वाढदिवसाच्या २ दिवस आधीच शरद पवारांनी दिल्लीत भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता, त्यावेळीही अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. याच दरम्यान, शरद पवार याना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावं अशी मागणी जोर धरू लागली आहे. खास करून शरद पवार गटाच्या नेत्यानी हि मागणी उचलून धरली आहे. याबाबत शरद पवार यांचे कट्टर विरोधक आणि नेहमीच पवारांवर खालच्या भाषेत टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना विचारलं असता त्यांनी एका वाक्यात या मागणीची खिल्ली उडवली.
सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरु आहे. यावेळी एका वृत्तवाहिनीने गोपीचंद पडळकर याना शरद पवारांच्या भारतरत्न पुरस्काराच्या मागणीबाबत विचारण्यात आलं. प्रश्न ऐकताच पडळकर याना हसू आवरलं नाही. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, मला शांत घरी जाऊद्या,, भारतरत्न पुरस्कार म्हणजे कोणत्या मंडळाचा पुरस्कार आहे का? काहीही मागणी केली जातेय असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी खिल्ली उडवली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांना शरद पवार यांना भारतरत्न देण्याबाबच्या मागणीबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आले असतं ते म्हणाले, होय हि मागणी अतिशय योग्य आहे. शरद पवार असे एकमेव कृषी मंत्री आहेत की, ज्यांच्या काळात ७२ हजार कोटींची विक्रमी शेतकऱ्यांची कर्ज माफी झाली. देशाच्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांमध्ये शरद पवारांचा मोठा वाटा राहिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अशी भावना आहे की, शरद पवारांना भारतरत्न पुरस्काराने गौरविले गेले पाहिजे. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनातही आम्ही याबद्दलची मागणी करू, असे निलेश लंके यांनी म्हंटल.
शरद पवार यांनी दिल्लीत आयोजित केलेल्या स्नेहभोजन कार्यक्रमाला अजित पवार आणि प्रफुल पटेल हे सुद्धा उपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का? या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलं आहे. यापूर्वीही शरद पवार आणि अजित पवार हे एकमेकांना विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटले होते. परंतु परवाच्या भेटीत दोघांमध्ये २० मिनिटे गुप्त चर्चाही झाली आहे. त्यामुळे आगामी काळात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असं बोललं जात आहे.




