हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असताना दुसरीकडे मराठा आणि कुणबी विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने मराठा तसेच कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यात निवासी वसतिगृहे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची बाहेर राहण्यासंबंधीत मोठी अडचण दूर होणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारने, खासगी संस्थांना स्वत:च्या मालकीच्या इमारतीत वा भाड्याच्या इमारतीत विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.
यापूर्वी 2018 साली मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सारथी संस्थेमार्फत जिल्हास्तरावर वसतिगृहे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. विशेष बाब म्हणजे या वस्तीगृहांसाठी शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था व मंडळाचा रिकामी इमारती भाड्याने देण्यास सरकारने मान्यता दिली होती. परंतु याला फारसा असा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता सरकारने थेट खाजगी संस्थांना मालकीच्या इमारतीत किंवा भाड्याच्या इमारतीत वसतिगृह सुरू करण्यासाठी मंजुरी दिली आहे. या मंजुरीनंतर 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून ही योजना करण्याबाबतची कार्यपद्धती नियोजन विभागाने जाहीर केली आहे.
दरम्यान, या वसतिगृहांमध्ये मराठा, कुणबी, कुणबी-मराठा तसेच मराठा-कुणबी अशा सर्व विद्यार्थ्यांना राहता येणार आहे. त्याचबरोबर इतर समाजातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना देखील वसतिगृहामध्ये प्रवेश घेता येईल. यामुळे या विद्यार्थ्यांचा एखाद्या दुसऱ्या ठिकाणी राहण्याचा प्रश्न मिटेल. विशेष बाब म्हणजे या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांसाठी चांगल्या सुविधा राबवल्या जातील. या विद्यार्थ्यांची जबाबदारी ही वसतिगृह सुरू केलेल्या या खाजगी संस्थांवर असेल.