सातारा | राज्यपाल साहेब, हेच का महाराष्ट्राला मोठे करणारे राजस्थानी? असा संतप्त सवाल एका साताऱ्यातील गणेश दुबळे यांनी सोशल मिडियाद्वारे राज्यपालांना विचारला आहे. तसेच कृपया पोलीस, नगरपरिषद प्रशासन यांनी या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन उचित कार्यवाही करण्याची विनंतीही गणेश दुबळे यांनी केली आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुजराती व राजस्थानी मुंबईतून गेल्यास पैसा शिल्लक राहणार नाही आणि मुंबईला अर्थिक राजधानी म्हणताच येणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर आता एका सामान्य सातारकरांने आपली चीड दाखवत हेच का राजस्थानी महाराष्ट्राला मोठे करणारे असा संतप्त सवाल केला आहे. जे राजस्थानी अनाधिकृतपणे महाराष्ट्रातील रस्त्या- रस्त्यावर उद्योगधंदे करून पोट भरत आहेत, महाराष्ट्राला मोठे करत आहे की महाराष्ट्राच्या अन् मराठी माणसांच्या जीवावर ते जगत आहेत. एकाने अतिक्रमण केल्यास दुसराही तेथे अतिक्रमण करत असतो. त्यामुळे नंतर पालिकेच मॅनेज होवून तेथे अनाधिकृतपणे ठाण मांडले जाते, असेही गणेश दुबळे यांनी हॅंलो महाराष्ट्रशी बोलताना सांगितले.
गणेश दुबळे यांची सोशल मिडियावरील पोस्ट वाचा
पोवई नाक्यावरील जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोरील “नो हाॅकर्स झोन” मध्ये एका रमेश नामक राजस्थानी भेळ पुरी वाल्या व्यावसायिकाने बेकायदेशीर पणे गाडी लावली होती. त्याला मी शुद्ध मराठीत तो बोर्ड दाखवून त्याचा अर्थ समजावून सांगितला आहे. तसेच तू हे ठिकाण सोडून बाजूला रस्त्यावर गाडी लावू शकतो, हे सुध्दा सांगितले आहे. कारण म्हातारी मेल्याचे दुःख नाही, काळ सोकावतो. आज एक गाडी लागली, उद्या इथं पन्नास गाड्या लागतील. मग ट्रॅफिक जॅम, अपघात, प्रशासनाचा कानाडोळा, फळकूट दादांचे फप्ते हे प्रकार सुरू होतील. त्यासाठी उद्यापासून इथं गाडी लावू नये, असे बजावले आहे. कृपया पोलीस, नगरपरिषद प्रशासन यांनी या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन उचित कार्यवाही करावी,ही विनंती.