औरंगाबाद : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व एपीएल शेतकरी योजनेत समाविष्ट नसलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील एपीएल शिधापत्रकाधारक लाभार्थ्यांना 8 रुपये प्रतिकिलो दराने प्रतिव्यकक्ती 1 किलो गहू आणि 12 रुपये प्रतिकिलो दराने प्रतिव्यकती 1 किलो तांदूळ वितरीत केला जाणार आहे. जून महिन्यात या अन्नधान्याचे वितरण केले जाणार आहे. यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात 2 लाख 40 हजार 51 शिधापत्रिकेतील 10 लाख 36 हजार 856 लाभार्थी पात्र असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले यांनी दिली.
कोरोना संकटकाळात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत तसेच एपीएल शेतकरी योजनेत सहभागी नसलेल्या एपीएल शिधापत्रिकाधारकांना जुन महिन्यात सवलतीच्या दरात अन्नधान्य वितरणाचा निर्णय महाराष्ट्रात शासनातर्फे घेण्यात आला आहे. लाभार्थ्यांना वितरणाकरीता औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एकूण 125.290 मेट्रिक टन तांदूळ व 155.26 मेट्रिक टन गहू एवढे अन्नधान्य उपलब्ध असून एपीएल लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन भोसले यांनी केले आहे.
रास्त भाव दुकानदारांकडे प्रथम मागणी करण्यास प्रथम या तत्त्वानुसार धान्य वितरण केले जाईल. तसेच धान्याचे वितरण करताना रास्त भाव दुकान यामार्फत शिधापत्रिकेचा क्रमांक व त्यावरील पात्र सदस्यांची संख्या व शिधापत्रिकेवरील संपूर्ण तपशील याची नोंद स्वतंत्र नोंदवहीमध्ये स्वाक्षरीसह घेण्यात येईल. या योजने बाबत कोणत्याही प्रकारची तक्रार शंका असल्यास त्यांनी संबंधित तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक निरीक्षण अधिकारी किंवा तहसीलदार यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन भोसले यांनी केले आहे.