Tuesday, January 31, 2023

साताऱ्यात सकल जैन समाजाच्यावतीने भव्य मोर्चा

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी |शुभम बोडके
झारखंड राज्यातील जैन धर्मियांचे पवित्र तीर्थस्थळ सम्मेद शिखरजी व सौराष्ट्रातील (गुजरात) येथील शत्रुंजय तीर्थावर पर्यटकांना असामाजिक तत्त्वांकडून होणारा उपद्रव या गोष्टींकडे लक्ष वेधण्यासाठी शहरातील सकल जैन समाजाच्यावतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये शहरातील एक हजारांहून अधिक जैन बांधव सहभागी झाले. हा मूक मोर्चा अजिंक्‍य कॉलनी येथील पार्श्‍वनाथ मंदिर ते पोवई नाका व तेथून जिल्हाधिकारी कार्यालय असा काढण्यात आला.

येथील 1008 दिगंबर जैन संघ, श्री श्‍वेतांबर स्थानक संघ,सुविधानात जैन श्‍वेतांबर मूर्तीपूजक संघ, आयटीआय ओसवाल जैन पंचायत वाडा व पार्श्‍वनाथ जैन मंदिर ट्रस्ट इत्यादी वेगवेगळ्या संघटना या मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या. यावेळी तहसीलदार एस. आर. जाधव व जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात नमूद आहे की झारखंड राज्य सरकारने 2 ऑगस्ट 2019 रोजी गिरीडिह जिल्ह्यात जैन धर्मियांसाठी असणारे पवित्र तीर्थस्थळ सम्मेद शिखरजी पारसनाथ या भागाला पर्यावरण कार्यक्रमांतर्गत इको सेन्सिटिव्ह झोन जाहीर केले. जैन समाजाच्यावतीने यासंदर्भात लक्ष वेधण्यात आले होते.

- Advertisement -

जैन तीर्थंकरांसाठी हे समाधी स्थळ मोक्षप्राप्तीचे ठिकाण असून येथे सतत भक्तांची ये जा असते. पारसनाथ पर्वतावर 15 जून 2022 रोजी हजारो लोकांचा मोर्चा गेला. या पवित्र तीर्थस्थळाची सुरक्षा आणि पावित्र्य जपण्यासाठी प्रशासनाने कोणती व्यवस्था केली नाही. जैनेतर समाजाच्या अनेकांनी मोक्षस्थळावर चप्पल घालून प्रवेश केला. यामुळे या तीर्थस्थळाचे पावित्र्य भंग पावले. जैन समाजाने यासंदर्भात राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाला पत्रव्यवहार केला आहे. पारसनाथ पर्वतराजीला पर्यावरण पर्यटनाच्या दृष्टीकोनातून इको सेन्सिटिव्ह झोनमधून हटवण्यात यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे. गुजरातमधील सौराष्ट्रात शत्रुंजय तीर्थावर असामाजिक तत्वांचा उपद्रव वाढला असून येथे मंदिरात तोडफोड करणे, यात्रेकरूंना त्रास देणे यासारखे प्रकार घडत आहेत. या आंतरराज्य प्रश्‍नांकडे सातारा जिल्ह्याचे तसेच संबंधित गुजरात आणि झारखंड सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 1000 जैन बांधवांनी हा मोर्चा काढून तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले