सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
जावळी तालुक्यातील महू धरणात सोमवारी दुपारी जनावरे चारण्यासाठी गेलेल्या प्रणव संतोष गोळे (वय १२ ) याचा धरणात पोहोताना बुडून मृत्यू झाला. प्रणव याचा मृतदेह संध्याकाळी उशिरा सातपर्यंत सापडला नाही. महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवान त्याला शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.
याबाबत मेढा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महू धरणात गावातील शिवराम नारायण गोळे हे आपला नातू प्रणव सोबत जनावरे चारण्यासाठी गेले होते. दुपारी तीनच्या दरम्यान शिवराम गोळे हे रस्त्याला लागूनच जनावरे चारत होते. जनावरांना पाणी पाजून शिवराम गोळे रस्त्याकडे निघाले. प्रणव हा त्या वेळी धरणात पोहण्यासाठी कपडे काढून पाण्यात उतरला. त्याच्या आजोबांनी त्याला आवाज दिला. त्यांचे न ऐकता तो पाण्यात पुढे सरकत होता. अचानकच पाण्यात दिसेनासा झाला. घाबरलेल्या त्याच्या आजोबांनी आपला पुणे येथील दुसरा मुलगा अजित शिवराम गोळे याला कळवले. त्याने लगेच गावातील लोकांना फोनवरून सांगितले. त्या वेळी गावातील युवकांनी धरणाच्या दिशेने धाव घेतली. त्याचा शोध घेतला.
परंतु प्रणव सापडत नसल्याने लगेच महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांना पाचारण केले. ट्रेकर्सचे सुनील बाबा भाटिया, अनिल केळगणे, अनिल लांगी, अमित झाडे, सौरभ साळेकर, आकेश धनावडे, दीपक झाडे, अमित कोळी, अक्षय नाविलकर हे जवान शोध घेत आहेत. संध्याकाळी सात वाजता ही प्रणवचा मृतदेह सापडू शकला नाही. शोधमोहीम अद्यापही सुरू आहे. सहायक पोलिस निरीक्षक अमोल माने, करहर दूरक्षेत्राचे हवालदार डी. जी. शिंदे व त्यांचे सहकारी भेट देऊन परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.