हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल २०२४ मध्ये आज सुपर संडे पाहायला मिळणार आहे. गत उपविजेता गुजरात टायटन्स आणि तब्बल ५ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकलेली मुंबई इंडियन्स (GT Vs MI Match) यांच्यात हाय वोल्टेज सामना रंगणार आहे. गुजरातची साथ सोडून मुंबईचा कर्णधार झालेला हार्दिक पांड्या आजच्या पहिल्या सामन्यात कस नेतृत्व करतो याकडे सर्वांचे लक्ष्य असेल. त्याचप्रमाणे मुंबईचा राजा म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा कर्णधारपदातून मुक्त झाल्यानंतर कशी फलंदाजी करतो याकडे सुद्धा मुंबईकर डोळे लावून बसले असतील.
गुजरात येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध गुजरात टायटन्स ( Gujarat Titans) सामना (GT Vs MI Match) संध्याकाळी ७:३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. दोन्ही संघाची तुलना केली असता कागदावर तर दोन्हीही संघ संतुलित दिसत आहेत. गुजरातच्या संघाबाबत बोलायचं झाल्यास, हार्दिक पंड्याने संघाची साथ सोडल्यानंतर थोडाफार फरक गुजरातला पडेल. मात्र नवा कर्णधार शुभमन गिलला फलंदाजी आणि नेतृत्व या दोन्ही बाबींवर स्वतःला सिद्ध करावे लागणार आहे. गुजरातकडे शुभमन गिल, वृद्धिमान साहा, केन विलियम्सन, मॅथ्यू वेड, डेव्हिड मिलर, साई सुदर्शन, विजय शंकर, राहुल तेवतीया सारखे फलंदाज आहेत. तर गोलंदाजी मध्ये अफगाणिस्तानची शान असलेला रशीद खान, उमेश यादव, मोहित शर्मा जोश लिटल यांच्यावर गुजरातची मदार असेल.
हार्दिकच्या समावेशामुळे मुंबईला १० हत्तीचे बळ– (GT Vs MI Match)
दुसरीकडे मुंबईच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, हार्दिक पंड्याच्या समावेशामुळे मुंबई इंडियन्सला १० हत्तीचे बळ मिळालं आहे. मात्र तो कर्णधार म्हणून किती यशस्वी ठरतो हे पाहणे मनोरंजक ठरेल. मुंबईची फलंदाजी हीच त्यांची खरी ताकद आहे. सलामीवीर रोहित शर्मा तुफान फार्मात आहे. त्याला ईशान किशन, हार्दिक पंड्या, टीम डेव्हिड, टिलक वर्मा, डेवाल्ड ब्रेव्हिस यांची साथ असेल. तर गोलंदाजी विभागात जसप्रीत बुमराह, अर्जुन तेंडुलकर, आकाश माधवाल, नुवान तुषारा याना चमक दाखवावी लागेल. अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबी मुंबईसाठी हुकमी एक्का ठरू शकतो.