हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जळगाव जिल्ह्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजप खासदार उन्मेष पाटील यांच्याकडून सध्या एकमेकांवर जोरदार टीकास्त्र डागले जात आहे. गुलाबराव पाटलांवर उन्मेष पाटील यांनी कुंपणच शेत खात असल्याची टीका त्यांनी केली होती. त्या टीकेला पाटलांनी प्रत्युत्तर दिली आहे. “नारायण राणे सारख्या नेत्याला मी खपवतो. हे तर चिल्लर आहेत, अशा माझ्या नादी लागू नये,” शब्दांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.
गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, वाळू माफियामध्ये चेतन शर्मा कोणत्या पक्षाचे होते हे खासदारांनी पाहावे, वाळू माफियामध्ये सर्व जातीचे, सर्व धर्माचे आणि सर्व पक्षाचे लोक होते. पण, खासदारांना गुलाबराव पाटील नावाचा रोग झालेला आहे. परिक्रमा करायची असेल तर नदीच्या काठावरुन फिरायला लागते.
आपल्याकडून काहीच होत नाही. त्यांना जिल्ह्यात कुणी विचारत नाही, म्हणून गुलाबराव पाटील नावाचा जप करत आहे. मागेच मी सांगितले आहे की, त्यांनी माझ्या नादी लागू नये, नारायण राणे सारख्या नेत्याला मी खपवतो. हे तर चिल्लर आहेत, अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी उन्मेष पाटलांवर निशाणा साधला आहे.
नेमके काय म्हणाले उन्मेष पाटील?
गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करताना उन्मेष पाटील यांनी म्हंटले होते की, पालक या शब्दाचा अर्थ समजून घेतला असता तर या बाबी समोर आल्या असत्या. कुंपणच शेत खात असेल तर व्यथा कुणाकडे मांडायाच्या अशी भावना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन या बाबतीत लोकांमधून आवाज उठवता येईल. पालकमंत्र्यांना 12 महिने झाले आहेत तरी बैठक घ्यायला वेळ नाही. तर, कोरोना लसीकरण झालेले आहे त्यामुळे आम्ही यासंदर्भात आवाज उठवता येतो का हे पाहणार आहे, असे उन्मेष पाटील यांनी म्हंटले होते.