हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकीकडे मुंबईत शिवसेना आणि अमरावतीचे राणा दाम्पत्य यांच्यातील वादामुळे वातावरण तापलं असतानाच तिकडे अमरावती मध्ये शिवसेना उपजिल्हा प्रमुख योगेश घरड यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. यामध्ये गरड जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. घरड यांच्यावरील हल्ल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
योगेश घारड हे शनिवारी रात्री नऊ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास वरूड शहरातील मुलताई चौकातून दुचाकीने जात होते. याचवेळी त्यांच्या मागून एका दुचाकीवर राहुल तडस व अन्य एक जण आला. त्या दोघांपैकी एकाने योगेश घारड यांच्यावर गोळीबार केला. यावेळी ही गोळी घारड यांच्या मांडीमध्ये लागली आहे. या घटनेची माहिती मिळताच वरुड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी मुलताई चौकात धाव घेतली.
दरम्यान, जखमी अवस्थेत योगेश घारड यांना सुरुवातीला वरुड रुग्णालयात व नंतर नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या प्रकरणातील हल्लेखोर राहुल तडस व त्याच्या साथीदाराचा पोलिस शोध घेत आहे. घारड यांच्यावर हल्ला का झाला, हे अद्याप समोर आले नाही. मात्र, या घटनेने वरूडसह संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.




