कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी
लॉकडाऊनमुळे गेल्या अनेक दिवसांपासून अनेक शहरातील घरे बंद आहेत. कोरोनाच्या प्रसारामुळे शहरातील अनेक कुटुंबे आपल्या गावी गेली आहेत. याचा फायदा घेत बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांकडून चोरी केली जात असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. अशीच घटना सोमवारी कराड शहरातील समर्थनगर येथे उघडकीस आली. येथील कलबुर्गी फोटो स्टुडीओचे मालक अवधुत भरतसा कलबुर्गी यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी रोख 50 हजार व तीन तोळे दागिने असा सुमारे पावणेदोन लाखांचा ऐवज चोरून नेला.
याबाबत अधिक माहिती अशी कि, “अवधुत भरतसा कलबुर्गी हे तीन दिवसांपूर्वी कामानिमित्त कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले होते. त्यानंतर सोमवार दि. 14 रोजी ते पुन्हा कराडमध्ये आल्यानंतर बंगल्यातील साहित्य विस्कटल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी अधिक माहिती घेतली असता घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी याबाबत त्वरीत शहर पोलिसांत संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घरातील 50 हजार रूपये रोख व तीन तोळे दागिने चोरीस गेल्याची माहिती प्रथमदर्शनी समोर आली आहे. पोलिसांनी ठसेतज्ञ, श्वानपथक यांना पाचारण केले. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची माहिती घेऊन चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
अवधुत भरतसा कलबुर्गी यांनी घरफोडीची माहिती देताच डीवायएसपी डॉ. रणजित पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय गोडसे यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच तपासाच्या अनुषंगाने माहितीही घेतली. तपासानंतर त्यांनी दिलेल्या आदेशानुसार चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक रवाना झाले आहे. या घटनेची नोंद रात्री उशीरा कराड शहर पोलिसांत झाली आहे. पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.