औरंगाबाद – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शुक्रवारी अधिसभा बैठकीत सदस्यांनी एकापाठोपाठ एक आरोप करत परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील कसे निष्क्रिय आहेत हे दाखवून दिले. या आरोपामुळे हैराण झालेले डॉ. पाटील यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. पाटील यांनी राजीनामा दिला असून तो स्वीकारल्याची माहिती कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली. त्यामळे आता रिक्त झालेल्या या महत्वाच्या पदावर कुलगुरू कोणाची नेमणूक करतात ? प्रभारी नेमणूक करतात कि पूर्णवेळ नेमणूक करतात या चर्चाना उधाण आले आहे.
विद्यार्थ्यांना गैरहजर दाखवणे, अनेक विद्यार्थ्यांना शून्य गुण देणे, वेळेवर निकाल न लावणे आदी प्रकारांमुळे विद्यार्थी वैतागले होते. चुका परीक्षा विभागाच्या आणि त्याचा त्रास विद्यार्थ्यांना का असा सवाल सदस्य भगवान डोभाळ, भारत खैरनार, नरहरी शिवपुरे, गोविंद काळे, भाऊसाहेब राजळे यांनी करून न डॉ. पाटील यांच्यावर कारवाईची मागणी केली. सदस्यांनी विद्यार्थ्यांची नावे घेऊन तक्रारी व त्यांचे निरसन न झाल्याचे प्रकार बैठकीत मांडले. यावर संचालक डॉ. पाटील यांनी उत्तर दिले. त्यावर सदस्यांचे समाधान न झाल्याने अकार्यक्षम म्हणत त्यांना बडतर्फीची मागणी केली. गदारोळ सुरू झाल्याने पाटील यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली.
तोच शब्द पकडून सदस्यांनी ठिय्या देत राजीनामा मंजूर करण्याची मागणी केली. एमकेसीएलमुळे परीक्षेत गोंधळ होत असल्याचे निदर्शनात आणून देत दोन वेळा पदवी प्रमाणपत्र छापल्याचे प्रकार घडल्याचा दावा विजय सुबुकडे यांनी केला. एमकेसीएलची यंत्रणाच परीक्षा आणि निकालासंदर्भातील गोंधळाला कारणीभूत आहे. विद्यापीठात प्रोग्रामर आहे. स्वतःची कमी खर्चात यंत्रणा उभी राहू शकते. त्यामुळे एमकेसीएलला हटवा अशी मागणीही त्यांनी केली. सतीश दांडगे यांनी एमकेसीएलपेक्षा विद्यापीठातील यंत्रणेचा वापर करून सक्षम पर्यायी यंत्रणा उभारण्याची मागणी केली.