हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टिच्चून गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला ICC कडून मोठं गिफ्ट मिळालं आहे. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) जागतिक पातळीवर T20 क्रिकेटमध्ये नंबर १ चा ऑल राऊंडर ठरला आहे. टी20 वर्ल्ड कपमधल्या दमदार कामगिरीमुळे हार्दिक पांड्याला दोन स्थानांचा फायदा झाला. आता तो श्रीलंकेचा वानिंदु हसरंगाबरोबर संयुक्तरित्या पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे.
अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १६ धावांची गरज होती. मात्र हार्दिक पंड्याने अतिशय प्रभावी गोलंदाजी करत आफ्रिकेला अवघ्या ९ धावाच करून दिल्या. तसेच धोकादायक फलंदाज डेव्हिड मिलरला बाद केलं. तत्पूर्वी त्याने आधीच्या ओव्हर मध्ये हेन्री क्लासेनला माघारी धाडलं होते. क्लासेनच्या त्या विकेट मुळेच भारतीय संघ हरता हरता पुन्हा एकदा सामन्याकडे परतला. यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पांड्याने 150 च्या स्ट्राईक रेटने 144 धावा केल्या. तर 11 विकेटही घेतल्या. एकूणच त्यांनी कामगिरी अतिशय दमदार राहिली आणि याचा थेट फायदा टीम इंडियाला झाला.
ICC ने जाहीर केलेल्या T20 मधील अष्टपैलूंच्या क्रमवारीत हार्दिक पांड्या 222 च्या रेटिंगसह नंबर वन वर पोचला आहे. त्याच्या बरोबर वानिंदू हसरंगा सुद्धा पहिल्या स्थानावर आहे. या दोघांशिवाय मार्कस स्टाइनिस तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. चौथ्या क्रमांकावर सिकंदर रझा आणि शाकिब अल हसन २०६ रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर आहे. भारताचा दुसरा अष्टपैलू अक्षर पटेलला सुद्धा सात स्थानांचा फायदा झाला असून तो ICC च्या क्रमवारीत 12 व्या क्रमांकावर पोहोचला आहे