हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशात आयपीएलचा माहौल असून या स्पर्धेनंतर सर्वांचे लक्ष्य जून मध्ये होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेकडे असणार आहे. भारतीय संघात एकाहून एक दमदार खेळाडू असताना अंतिम १५ जणांच्या संघात कोणाकोणाचा समावेश होणार हे पाहणे महत्वाचे आहे. लवकरच भारतीय निवड समिती T20 विश्वचषक साठी संघाची घोषणा करेल. मात्र त्याच दरम्यान अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) निवडीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहेत. हार्दिकची जर भारतीय संघात निवड करायची असेल त्याला नियमितपणे गोलंदाजी करावी लागेल अशी अट BCCI ने ठेवल्याचं बोललं जात आहे.
भारतीय निवड समितीचे संपूर्ण लक्ष्य हार्दिक पंड्याच्या कामगिरीकडे आहे. एका चॅनेलच्या वृत्तानुसार, नुकतीच बीसीसीआयने राहुल द्रविड आणि रोहित शर्मा यांच्यासोबत संघ निवडीबाबत चर्चा केली, ज्यामध्ये हार्दिकला संघात यायचे असेल तर त्याला नियमितपणे गोलंदाजी करावी लागेल, त्यानंतरच त्याच्या निवडीचा विचार करता येईल. सध्या आयपीएलमध्ये हार्दिक पंड्या या नियमितपणे गोलंदाजी करत नाही. तसेच त्यांच्या गोलंदाजीला धारही नाही. त्यामुळे बीसीसीआय त्याच्या निवडीवर विचार करत आहे.
हार्दिक पंड्याने यंदाच्या आयपीएल मध्ये आतापर्यंत खेळलेल्या एकूण 6 पैकी फक्त 4 सामन्यांमध्ये गोलंदाजी केली, त्यामध्येही त्याला सपाटून मार खावा लागला. हार्दिकने गुजरात टायटन्सविरुद्ध 3 ओव्हर, सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 4 ओव्हर, बेंगळुरूविरुद्ध एक आणि चेन्नईविरुद्ध ३ ओव्हर टाकल्या. चेन्नई विरुद्धच्या सामन्यात तर हार्दिक पांड्याला धोनीने ३ खणखणीत षटकार ठोकले होते. हेच षटकार सामन्यानंतर महत्वाचे सुद्धा ठरले होते. त्यामुळे हार्दिक पंड्या टीकाकारांच्या निशाण्यावर आला होता.
हार्दिक पंड्याची निवड आणखी अवघड होणार असल्याचे आणखी एक कारण म्हणजे सध्या चेन्नईकडून खेळत असलेल्या शिवम दुबेचा जबरदस्त फॉर्म…. आपल्या आक्रमक फलंदाजीने भल्या भल्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवणारा दुबे T20 विश्वचषक स्पर्धेसाठी प्रबळ दावेदार आहे. दुबे मध्यमगती गोलंदाजी करत असल्याने हार्दिकसाठी सर्वात मोठा खतरा आहे.