हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) सध्या सर्वत्र चर्चा असते. आयपीएल सुरु होण्यापूर्वीच मुंबईने अचानक रोहित शर्माला डच्चू देऊन हार्दिक पांड्याला कर्णधार केलं, मात्र मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना हा निर्णय काय रुचला नाही. हार्दिकमुळेच रोहितचे कर्णधारपद गेलं ही भावना मुंबईच्या नि रोहित शर्माच्या चाहत्यांच्या मनावर खोलवर रुजली आणि त्याचाच परिणाम म्हणजे मुंबई इंडियन्सच्या प्रत्येक सामन्यावेळी चाहत्यांकडून हार्दिकला जोरदार ट्रोल केलं जात आहे. चाहत्यांच्या या ट्रोलिंगचा परिणाम हार्दिकच्या कामगिरीवर होत असून आत्तापर्यंत त्याला साजेशी अशी कामगिरी करत आलेली नाही. याच दरम्यान, माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाने (Robbin Uthappa) हार्दिकबाबत केलेल्या एका विधानाने खळबळ उडाली आहे.
हार्दिक पंड्या मानसिक समस्यांनी ग्रस्त असल्याचे उथप्पाने म्हटले आहे. “द रणवीर शो’मध्ये बोलताना उथप्पा हार्दिक पंड्याबद्दल भरभरून बोलला. हार्दिकच्या बाबतीत जे घडत आहे ते त्याला नक्कीच दुखावत असेल. तो सुद्धा एक माणूसच आहे. ज्या संघाने त्याला बनवलं ओळख दिली त्याच संघाने नंतर त्याला सोडून दिले. त्यामुळे तो दुसऱ्या फ्रेंचायझीकडे गेला. ज्या संघातून त्याने 3-4 आयपीएल ट्रॉफी जिंकल्या त्याच संघाला सोडताना हार्दिकला नक्कीच वाईट वाटलं असेल. मात्र त्यानंतर सुद्धा त्याने गुजरात टायटन्सच्या संघाला विजेतेपद मिळवून दिले.
उथप्पा पुढे म्हणाला, “त्याच्या फिटनेसबद्दल जोक्स, ट्रोलिंग, मीम्समुळे हार्दिकला नक्कीच दुःख होत असेल. त्यामुळे हार्दिक मानसिक समस्यांनी ग्रस्त आहे असं उथप्पा म्हणाला. भारतीय म्हणून आपण सगळेच इमोशनल आहोत, परंतु कोणत्याही व्यक्तीला अशी वागणूक देणं योग्य नाही. एखाद्याशी असं करणं आणि ते बरोबर आहे असं समजणं समाज म्हणून अशोभनीय आहे. त्यावर आपण हसू नये असे रॉबिन उथप्पाने म्हंटल.
दरम्यान, यंदाच्या आयपीएल मध्ये हार्दिक पंड्या खास अशी कामगिरी करू शकलेला नाही. हार्दिकने आत्तापर्यंत 7 सामन्यांमध्ये 4 विकेट्स घेतले असून 146.87 च्या स्ट्राईक रेटने 141 धावा केल्या आहेत. मुंबई इंडियन्सचा संघ सुद्धा हार्दिकच्या नेतृत्वाखाली दमदार कामगिरी करू शकलेला नाही. त्यामुळे त्याच्यावर होणारी टीका कमी होण्याऐवजी वाढतच आहे. रोहित शर्माचे चाहते तर मुंबईच्या प्रत्येक पराभवासाठी हार्दिक पांड्यालाच जबाबदार ठरवत आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघात सर्व काही आलबेल वाटतं नाही.