सतेज औंधकर | कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ समजल्या जाणाऱ्या कागल तालुक्याला कॅबिनेट मंत्री पद मिळाल्यानंतर नूतन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे तालुक्यात जोरदार स्वागत करण्यात आले. कागल तालुक्यातील मुरगुड इथं निघालेल्या भव्य स्वागत रॅलीमध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना पाचशे किलो वजनाच्या फूलांचा भव्यदिव्य हार घालण्यात आला. मुरगूडच्या मुश्रीफप्रेमी कार्यकर्त्यांनी मिरवणुकीच्या मुख्य रस्त्यावर क्रेनच्या सहाय्याने हा 500 किलोचा हार मुश्रीफांच्या गळ्यात घातला. या पाचशे किलो हाराची चर्चा केवळ कोल्हापुरातच नाही तर राज्यभरात रंगल्याचं पहायला मिळाली.
हसन मुश्रीफ हे शरद पवार यांचे निकटवर्तीय समजले जातात. राष्ट्रवादी पक्षाचं संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी वेळोवेळी सहकार्य केलं आहे. पक्षातील मातब्बर नेते सोडून जात असताना त्यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहत कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीचं वर्चस्व पुन्हा प्रस्थापित केलं. सतेज पाटील यांच्यासोबत त्यांनी सुरू केलेला ‘आमचं ठरलंय’ हा पॅटर्नही राज्यभर गाजला. एकूणच महाविकासआघाडीची सत्ता आल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात हसन मुश्रीफ हे हुकमाचे एकके ठरणार यात शंका नाही.