आ. बाळासाहेब पाटलांच्या विरोधात मुंबईत भाजपाची मोर्चेबांधणी, उमेदवार ठरला?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील

कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार व माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना तगडे आव्हान देण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून हालचाली सुरू केलेल्या आहेत. तर अनेकदा आमदारकीची स्वप्न ही स्वप्नचं काहींना काही कारणाने राहिलेले धैर्यशिल कदम सध्या आगामी विधानसभेसाठी मुंबईत फिल्डिंग लावत आहेत. त्यासाठी गेल्या दोन- तीन दिवसापासून मुंबईत तळ ठोकत भाजपाच्या नेत्याच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे. त्यामुळे आ. बाळासाहेबांना शह देण्यासाठी एक नवा प्रयोग कराड उत्तरेत आखला जात आहे.

भारतीय जनता पक्षाचे सध्या राज्यात आणि केंद्रात सरकार आहे. सातारा जिल्ह्यात भाजपाने मतदार संघात सक्षम उमेदवार शोध मोहिम गेल्या पंचवार्षिक निवडणुकापासून राबविली आहे. यामध्ये काही प्रमाणात यशही आले आहे. प्रामुख्याने सातारा- जावळी मतदार संघात दोन्ही राजे, माण- खटावला आ. जयकुमार गोरे आणि फलटणला माढ्याचे खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांच्यामुळे चांगलाच शिरकाव केला. तर कोरेगाव विधानसभा मतदार संघात चिन्हाने आ. महेश शिंदे याचा विजय शिवसेनेला मिळाला, मात्र आ. शिंदे हे मनाने भाजपाचे होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून किंवा बंडखोर शिवसेना शिंदे गटाकडून आ. शिंदे असले तरी त्यांचा कल हा भाजपाकडे राहिल अन् भाजपाचा आ. शिंदे यांच्याकडे असेल. कराड दक्षिणेत विजय मिळाला नसला तरी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांना फाईट देणारे डाॅ. अतुल भोसले हे सक्षम उमेदवार मिळाले आहेत. फलटणला रणजिंतसिंह नाईक- निंबाळकरही आपली फाैज घेवून राष्ट्रवादी विरोधात लढत देत आहेत. पाटण विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे बंडखोर आ. शंभूराज देसाई यांचा स्वतंत्र गट असून तेथे गटा- तटाचे राजकारण होत आलेले आहे, हा इतिहास आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसाचे मित्र असलेले आ. देसाई यांना भाजप आपलेच मानतात.

सातारा जिल्ह्यात या राजकीय घडामोडीत केवळ कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील यांना तगडे आव्हान देणारा उमेदवार, चेहरा भाजपाकडे नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप- शिवसेना युतीत मतदार संघ शिवसेनेला गेला. अशावेळी भाजपाकडून शड्डू ठोकून मैदानात तयार असलेले उमेदवार मनोज घोरपडे यांचा हिरमोड झाला. तरीही त्यांनी अपक्ष लढत दिली. शिवसेनेकडून धैर्यशिल कदम यांना अनपेक्षित तिकीट मिळविण्यात यश मिळाले. कराड उत्तरेत तिरंगी लढतीमध्ये अपक्षेप्रमाणे आ. बाळासाहेब पाटील यांनी हॅट्रीक केली, तीही विक्रमी मताधिक्य घेत. या विजयामुळे राष्ट्रवादीला आव्हान देणारे दोन्ही नेते विजयापासून दूर फेकले गेले, त्यामुळे आ. पाटील यांना महाविकास आघाडीत मंत्रिपदाची लाॅटरी लागली. तसेच विरोध, विरोधक संपले असेच वातावरण गेल्या अडीच वर्षात पहायला मिळत आले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला सातारा जिल्ह्यात हादरा देण्यासाठी आणि सातारा जिल्ह्यात पहिल्या दोन क्रमाकांत भाजपा असेल. यासाठी आता केवळ कराड उत्तर मतदार संघ सक्षम उमेदवाराविना आहे. तर अनेकदा आमदरकीचे स्वप्न घेवून मैदानात उतरूनही अपेक्षाभंग होणाऱ्या धैर्यशिल कदमांना आता एक आशा निर्माण झाली आहे. ती म्हणजे भारतीय जनता पक्षातून उभे राहून राष्ट्रवादीला आव्हान देवून रिंगणात उतरत आपले अस्तित्व निर्माण करायचे. त्यासाठी विधानसभा अधिवेशात आ. जयकुमार गोरे यांच्यासोबत खा. रणजिंतसिंह नाईक- निंबाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास आणि धैर्यशिल कदम हे तळ ठोकून आहेत. येत्या काही दिवसात ते भाजपात जाणार हे निश्चित आहे, मात्र, मुहूर्त व वेळ केव्हाचा हे ठरविले जात असल्याने लवकरच कराड उत्तरेत कमळ चिन्ह घेवून धैर्यशिल कदम आपले कदम पुढे टाकतात का? हे आगामी निवडणुकीतच कळेल.