औरंगाबाद – सासरी नांदणाऱ्या लेकीला शेतकरी बापानं फोन लावावा, ‘पोरी, तुझा बाप कर्जबाजारी झालाय, आता कर्ज फेडू शकत नाही. जगणं असहाय्य झालंय, इथं बघ शेतातील झाडाला गळफास घेतोय, लवकर मातीला ये..’ असं मोबाइल सांगत आत्महत्या करावी. हा हृदय पिळवटून टाकणारा हा प्रसंग औरंगाबादमधील सिल्लोडमध्ये घडलाय. कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यानं बुधवारी पहाटेच चिंचोटी परिसरात आत्महत्या केली. बालासाहेब लक्ष्मण गोंडे (42) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
चिंचोटी येथील रहिवासी असलेल्या बालासाहेब यांचे पिंपरखेड शिवारात पांढरी येथे दीड एकर शेती आहे. मंगळवारी रात्री 9 वाजता घरातील मंडळींना शेतात चाललो आहे, गोठ्यातच झोपणार आहे, असे म्हणत शेतात गेले. बुधवारी सकाळी सहा वाजता नादलगाव येथे सासरी राहणाऱ्या मुलीला फोन केला. गीतांजली, तुझा बाप कर्जबाजारी झालाय. आता कर्ज फेडू शकत नाही. शेतात यंदा पिकही आलं नाही. सगळं पिक वाया गेलंय. तू लवकर ये, मी आत्महत्या करतोय, असं म्हणत मोबाइलवरचं संभाषण संपवलं. गितांजलीने चुलत भाऊ कालिदास याला तत्काळ फोन करून या प्रसंगाची माहिती दिली. दोघा-तिघांनी मिळून शेतात धाव घेतली. पण तोपर्यंत बालासाहेब लक्ष्मण गोंडे हे दोरीच्या सहाय्याने बोरीच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.
या घटनेची माहिती वडवणी पोलिसात देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा केला. गोंडे यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबात पत्नी, आई-वडील, एक अविवाहित मुलगी आणि दोन विवाहित मुलीसह 10 वर्षांचा मुलगा आहे.