तिसंगीतील तलाठ्यास 6 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली | आजोबांच्या वारसाची बक्षीस पत्राची हक्क अधिकार पत्रकात नोंद धरण्यासाठी सहा हजार रुपयांची लाच घेताना कवठेमहांकाळ तालुक्यातल्या तिसंगी येथील तलाठ्यास लाच लुचपत विभागाने रंगेहात जेरबंद केले. रामू पांडुरंग कोरे असे त्या लाचखोर तलाठ्याचे नाव आहे.

तिसंगीतील तलाठी कार्यालयातच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून सदरची कारवाई केली. तक्रारदार यांच्या आजोबांनी तक्रारदार व त्यांची आई यांच्या नावाने केलेल्या बक्षीस पत्राची हक्क अधिकार पत्रकात नोंद धरण्यासाठी तिसंगी येथिल तलाठी रामू कोरे यांनी तक्रारदार यांच्याकडे 9 हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबतची तक्रार तक्रारदार यांनी सांगलीच्या लाच लुचपत प्रतिबंध कार्यालयाकडे केली होती.

तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीनुसार सोमवार दि. 10 मे रोजी पडताळणी केली असता. त्यामध्ये तलाठी कोरे यांनी चर्चेअंती 6 हजार रूपये लाचेची मागणी करून मंगळवारी पैसे घेवून येण्यास सांगीतल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मंगळवारी तिसंगी येथील तलाठी कार्यालयात लाच लुचपत विभागाने सापळा लावला असता रामु पांडुरंग कोरे यांनी तक्रारदारांकडे लाचेची मागणी करून त्यांच्याकडून 6 हजार रूपये घेत असताना रंगेहात पकडण्यात आले. कोरे यांच्या विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.