हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारतासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारी पहिली सौर मोहीम म्हणजेच आदित्य एल-1 च्या प्रक्षेपणावेळी इस्रोचे (ISRO) प्रमुख एस. सोमनाथ (S. Somanath) कॅन्सरने त्रस्त होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये स्वत: एस. सोमनाथ यांनी या गंभीर आजाराचा खुलासा गेला आहे. यावेळी त्यांनी, “चंद्रयान -3 मोहिमेच्या लाँचिंगवेळीच आपल्याला आरोग्याविषयी समस्या जाणवू लागल्या होत्या, मात्र स्पष्टपणे समजले नव्हते” असे आपल्या मुलाखतीत सांगितले आहे
पोटाच्या कॅन्सरशी झुंज
एका मुलाखतीत बोलताना सोमनाथ यांनी माहिती दिली की, आजाराविषयक समस्या त्यांना चंद्रयान 3 मोहिमेच्या लॉन्चिंग वेळी जाणवू लागल्या होत्या. मात्र याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. परंतु आदित्य एल-1 मोहिमेच्या प्रक्षेपणादिवशी त्यांना आपल्याला पोटाचा कॅन्सर झाल्याचे कळले. यामुळे ते आणि त्यांचे कुटुंब अत्यंत चिंतेत पडले होते. सोमनाथ यांच्या आजाराविषयी सहकार्यांना कळल्यानंतर त्यांना देखील मोठा धक्का बसला होता. परंतु त्यांनी या वातावरणामध्ये स्वतःला सावरले.
मुख्य म्हणजे, आदित्य एल-1 मोहिमेच्या प्रक्षेपणानंतर सोमनाथ यांच्या पोटाचे स्कॅन करण्यात आले. यानंतर त्यांना कर्करोग झाल्याचे उघडकीस आले. यानंतरच ते अधिक तपासणीसाठी चेन्नईला गेले. या तपासणीतून हा आजार त्यांना अनुवांशिकरीत्या मिळाल्याचे सांगण्यात आले. गेल्या काही दिवसांपूर्वीच सोमनाथ यांना असलेल्या कर्करोगाचे निदान करण्यात आले. आता त्यांना केमोथेरेपी दिली जात आहे. मात्र तरीदेखील सोमनाथ हे आपल्या कामाकडे पूर्ण वेळ लक्ष देत आहेत.
याविषयी बोलताना सोमनाथ यांनी म्हटले की, “अनेकदा स्कॅनिंग, बऱ्याच वैद्यकीय तपासण्या झाल्या असून सध्या माझं पूर्ण लक्ष, मी माझं काम आणि इस्रोच्या मिशन्सवर केंद्रीत केलं आहे. इस्रोचे सर्व मिशन पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही” सोमनाथ यांनी दाखवलेल्या या विश्वासामुळे सहकार्यांना आणि कुटुंबाला धीर मिळाला आहे. यातच ते उपचार घेत आपल्या कामाकडे देखील लक्ष देत आहेत.