हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनासारख्या विषाणूला सगळ्या जगाला सामोरे जावे लागले. भारतातही कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव पाहायला मिळाला. त्यातही कोरोनाचा विळखा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात होता. महाराष्ट्रात अधिक गंभीर स्थिती होती. अशाही काळात महाराष्ट्र सरकारने सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून निर्णय घेतले, अशा शब्दात केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राज्य सरकारचं कौतुक केलं.
देशातील विविध राज्यांनी केलेल्या कोरोना उपाययोजनांचा आढावा बुधवारी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला. या बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासह सात राज्यांचा आढावा घेतला. या बैठकीला राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास उपस्थित होते.
“कोरोना नियंत्रणासाठी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून चाचण्यांचे दर कमी करणे, एचआरसीटी चाचण्यांच्या दरांवर नियंत्रण, प्लाझ्माच्या दरावर तसेच मास्कच्या दरांवर नियंत्रण, खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा राखीव ठेवणे, महात्मा फुले जनआरोग्य योजना सर्व नागरिकांना लागू करणे, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम’ यांसारखे चांगले अभिनव निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतले. ते अन्य राज्यांसाठीही उपयुक्त ठरतील”, अशा शब्दात केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी यावेळी कौतुक केले.