नाशिक : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांचा मृतदेह एका गाडीत जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. त्यांचा मृत्यू हा अपघात होता कि घातपात होता हे स्पष्ट झाले नव्हते. यानंतर जळालेल्या गाडीत आढळलेल्या मृतदेहाचा डीएनए अहवाल समोर आल्यानंतर मृतदेहाचा डीएनए आणि डॉ. सुवर्णा वाजे यांचा डीएनए सेम असल्याचे स्पष्ट झाले होते. यामुळे डॉ. सुवर्णा वाजे यांची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पोलिसांनी नातेवाईकांच्या जबाबावरून मृत सुवर्णा यांचे पती संदीप वाजेला अटक केली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी पती संदीप वाजेसह त्याच्या अन्य पाच साथीदारांविरोधात नाशिक ग्रामीणच्या वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
काय आहे नेमके प्रकरण ?
डॉ. सुवर्णा वाजे या नाशिक महानगरपालिकेच्या सिडको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. घटनेच्या दिवशी रायगड नगर परिसरात एका जळालेल्या कारमध्ये मृतदेह आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. डॉ. सुवर्णा वाजे या बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांनासुद्धा दिली होती. पोलीस तपासात जळालेल्या गाडीचा चेसी नंबर आणि गाडी नंबर यावरुन ही गाडी डॉ. सुवर्णा वाजे यांची असल्याचं स्पष्ट झालं होते. यानंतर पोलिसांनी मृतदेहाचा डीएनए आणि डॉ. सुवर्णा वाजे यांचा डीएनए चेक केला असता तो एकच असल्याचे समोर आले.
या प्रकरणी पोलिसांनी नातेवाईकांची चौकशी केली असता डॉ. सुवर्णा वाजे यांचा पती संदीप यानेच आपल्या पत्नीचा थंड डोक्याने काटा काढल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते. कौटुंबीक कलह आणि त्यातून उडणारे वारंवार खटके यातूनच संदीप वाजे याने आपल्या मित्रांच्या मदतीने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. यानंतर आरोपींनी गाडीसह पत्नीचा मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी याचा कसून तपास करून आरोपी पतीला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.