हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या देशातील वाढत्या उष्णतेने नागरिकांना हैराण करून सोडले आहे. यात तापमानाचा पारा चाळीशीच्या ही पार गेल्यामुळे उष्माघाताचा त्रास लोकांना अधिक जाणवू लागला आहे. अशातच पुढील पाच दिवसात महाराष्ट्रसह गुजरातमध्ये उष्णतेची लाट (Heat Wave) येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 3 ते 5 मे कालावधीत मध्य भारतात उष्णतेची लाट येणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. तसेच रात्रीच्या वेळी उष्ण आणि दमट हवामान राहील, असेही सांगितले आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 3 ते 5 मे पर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, गुजरात राज्यातील तुरळक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यातील नागरिकांनाही उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागेल. त्यामुळे पुढील 5 दिवस महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील नागरिकांना अधिक उकाड्याचा सामना करावा लागेल. तर, 1 आणि 2 मे दरम्यान, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये रात्री उकाडा जाणवेल. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
दरम्यान, पश्चिम बंगाल, पूर्व झारखंड, उत्तर ओडिशा आणि रायलसीमा येथील कमाल तापमान पुढील पाच दिवस 44 ते 47°C च्या आसपास राहील आणि त्यानंतर कमी होईल, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. तर, ओडिशा, बिहार, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, झारखंडमधील काही तुरळात भागात उष्णतेच्या तीव्र लाटेची परिस्थिती निर्माण होईल, अशी शक्यता ही वर्तवण्यात आली आहे. तिथून पुढे तापमानाचा पारा घसरेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
नागरिकांची काळजी घ्यावी
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. लहान मुलांनाही उकाडा सहन होत नसल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. या काळात कांजण्या येण्याचे, इन्फेक्शन होण्याचे, भोवळ येण्याचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे नागरिकांनी स्वतः लहान मुलांची अधिक काळजी घ्यावी , असे आव्हान प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच, महत्वाचे काम असल्यावर घराच्या बाहेर पडावे, तोंडाला स्कार्फ रुमाल बांधावा, भरपूर पाणी प्यावे, असेही सांगण्यात आले आहे.