कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
अतिवृष्टीचा फटका सातारा जिल्ह्याला चांगलाच बसला आहे. अतिवृष्टीमुळे तलाव, विहिरी, पाणी पुरवठा योजना यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक तलाव, पाणी पुरवठा योजनांच्या पाईपलाईन फुटल्या आहेत. त्यांचे पंचनामे लघु पाटबंधारे विभागाकडून केले जात आहेत. पाटण तालुक्यातील वरेकरवाडी परिसरातील तलावाच्या भिंतीला मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. त्यामुळे याकडे लवकर लक्ष न दिल्यास तलाव फुटण्याची भीती स्थानिक ग्रामसंस्थांतून व्यक्त केली जात आहे. तलाव फुटून नुकसान होण्यापूर्वी संबंधित विभागाने आवश्यक पावले उचलून संभाव्य नुकसान टाळावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाटण तालुक्यातील कुंभारगाव परिसरात डोंगरावर वरेकरवाडी हे गाव वसले आहे. या गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर पाझर तलाव आहे. या तलावाचे बांधकाम १५ वर्षांपूर्वी करण्यात आले आहे. या तलावाच्या खालच्या बाजूला झरा व पाण्याचे चेंबर तसेच काही अंतरावरच सार्वजनिक विहीर देखील आहे. या तलाव शेजारून नेहमी ग्रामस्थांची ये-जा होत असते. काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे तलाव, विहिरी या तुडूंब भरून वाहू लागल्या आहेत. तर या अतिवृष्टीचा फटका काही तलाव, पाणी पुरवठा योजनांना बसला आहे. यामध्ये पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागात असलेल्या काही तलावांच्या भिंती खचलया आहेत.
त्यामध्ये पाटण तालुक्यातील वरेकरवाडी येथील तलावाचाही समावेश आहे. या तलावाच्या भिंतीचा भाग खचून त्याला मोठ्या भेगा पडल्याने तलाव फुटण्याची भीती आहे. तलाव फुटल्यास त्यातून बाहेर येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे शेतीसह विहीर, चेंबर व पाइपलाइनचेही नुकसान होऊ शकते. या परिसरातील यादववाडीत लगत असलेल्या पठारावरील पिण्याच्या पाणी पुरवठ्याची बंदिस्त विहीर, मोटार, पत्रे तसेच पाइपलाइनचीही हानी झाली आहे.