हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२२ मध्ये आपल्या ४० आमदार आणि १३ खासदारांसह भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंकडे असलेला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना दिले. त्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना असे शिवसेनेत २ गट पडले आहेत. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करत असतात. एकनाथ शिंदेनी गेल्या काही दिवसापासून ठाकरे गटाला खिंडार पाडत अनेक नगरसेवक, माजी आमदारांना आपल्या पक्षात घेतलं. मात्र आता पहिल्यांदाच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शिंदेंना धक्का देण्याच्या तयारीत आहेत. कारण एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटातील एक खासदार पुन्हा एकदा परतीच्या मार्गावर असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत.
आम्ही तुम्हाला ज्या खासदाराबद्दल सांगत आहोत त्यांचे नाव आहे हेमंत गोडसे (Hemant Godse) … ते सध्या नाशिक लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधींत्व करत आहेत. सध्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते तिकीट मिळण्यासाठी इकडून तिकडे पक्ष बदलत आहेत. त्यातच आता ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी जाहीर सभेत गोडसे यांच्याबद्दल एक मोठं विधान केलं आहे. हेमंत गोडसे अनेक दिवसांपासून मिलिंद नार्वेकरांना भेटत आहेत. नार्वेकर यांच्यामार्फत ठाकरे गटात एंट्रीचा गोडसे यांचा प्रयत्न सुरु आहे, असा गौप्यस्फोट बडगुजर यांनी केला आहे. नार्वेकरांनी सांगितलं की, ‘हेमंत गोडसे आपल्याकडे फेऱ्या मारत आहेत.’ पण मी म्हटलं, गोडसेंना घेतलं, तर नाशिकमध्ये फटाके फुटतील. पदाधिकारी चिडलेले असल्यामुळे ते थांबणार नाहीत. त्यामुळे हेमंत गोडसेंना घेऊ नका असेही सुधाकर बडगुजर यांनी म्हंटल.
नाशिक लोकसभा मतदारसंघातून भाजपचे इच्छुक उमेदवार दिनकर पाटील आणि खासदार हेमंत गोडसे यांच्यातील वाद समोर आला आहे. भाजप नाशिकची जागा लढवण्याची सुद्धा शक्यता आहे. त्यामुळे जर ही जागा भाजपने स्वतःकडे घेतली तर हेमंत गोडसे मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहेत. त्यामुळे आता हेमंत गोडसे ठाकरे गटात पुन्हा येतात का? आणि ठाकरे त्यांना पुन्हा आपल्या पक्षात स्थान देतात का? हे आता येणारी वेळच सांगेल एवढं मात्र नक्क्की…..