हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण देशात मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला आहे. २ दिवसांपूर्वी केरळमधील वायनाड येथे भुस्कलन होऊन अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती. ती घटना अजूनही ताजी असताना आता हिमाचल प्रदेशातील कुल्लू आणि शिमला जिल्ह्यांजवळ ढगफुटी (Himachal Pradesh Cloudburst) झाल्याची घटना समोर येत आहे. या पावसामुळे अचानक पूर आला आणि सुमारे 19 लोक या पाण्यात वाहून गेल्यास सांगितलं जातंय. त्यामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
ढगफुटीनंतर एकाचा मृतदेह सापडला- Himachal Pradesh Cloudburst
कुल्लूच्या रामपूर भागातील समेज येथील पॉवर प्लांट प्रकल्पातील 19 लोक ढग फुटीनंतर बेपत्ता आहेत. तर 20 पेक्षा जास्त घरे जमीनदोस्त होऊन गाडली गेली आहेत. अनेक वाहने सुद्धा या पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत, परिसरातील शाळाही पुरात वाहून गेल्या आहेत. मंडी जिल्ह्यात ढगफुटीनंतर एकाचा मृतदेह सापडला आहे, तर नऊ जण बेपत्ता आहेत. मंडी जिल्हा प्रशासनाने हवाई दलाला बचावासाठी सतर्क केले आहे. घटनास्थळी उपस्थित स्थानिक प्रशासन मदतकार्यात गुंतले आहेत. थलतुखोडमध्ये अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे शक्य नसल्याने आता हवाई दल आणि एनडीआरएफच्या मदतीने लोकांना बाहेर काढण्यात येणार आहे. याबाबत रामपूरचे उपायुक्त अनुपम कश्यप यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच तातडीने एसडीआरएफची टीम रवाना करण्यात आली आहे. तसेच पोलीस, रेस्क्यू टीम देखील पोहोचली आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार ढगफुटीमध्ये १९ लोक बेपत्ता झाले आहेत.
ढगफुटीमुळे (Himachal Pradesh Cloudburst) हिमाचल प्रदेशातील शिमला आणि कुल्लू जिल्ह्यातील रामपूरला लागून असलेल्या १५-२० भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीखंडच्या डोंगरावरील नैन सरोवराभोवती ढगफुटीमुळे कुरपण, समेळ आणि गणवी नाल्यांना महापूर आला आहे. शिमला जिल्ह्यातील गणवी मार्केट आणि कुल्लू जिल्ह्यातील बागीपुल मार्केटमध्ये नाले ओसंडून वाहत असल्याने उध्वस्त झाली आहे. याठिकाणी मोबाईल सेवा ठप्प झाली आहे. तसेच रस्ते देखील उखडले गेले आहेत. एकूणच काय तर हिमाचल प्रदेशात सध्या पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.