सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांनी काही लोकांचा PFI शी संबंध असल्याबाबतच्या शक्यतेवरून चौकशीची मागणी करण्यात आली आहे. कराड तालुक्यातील रेठरे बु, वडगाव हवेली, खंडाळा, फलटण, भुईंजसह जिल्ह्यात अनेक ठिकाणच्या पोलिस स्टेशनमध्ये याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. कराड येथे हिंदू एकता आंदोलन समितीकडून निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, देशात धार्मिक अराजकता माजवण्याच्या प्रयत्नात असलेल्या पी.एफ. आय.संघटनेवर नुकतीच केंद्र सरकारने बंदी घातली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये या संघटनेशी संबंधित काम चालू असल्याची शक्यता असल्याच्या संशयावरून अल्ताफ शिकलगार सादिक शेख, रमजान कागदी, जमीर शेख, रफिक शेख यांना अटक करून यांची सखोल चौकशी करण्याची मागणी हिंदू एकता आंदोलन साताराच्या वतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी निवेदन देऊन करण्यात आली.
सातारा जिल्ह्यामध्ये “रोहिंग्या बांगलादेशी मुस्लिम” समाज मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतरित होत असल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले असून या सर्व स्थलांतरितांना आर्थिक रसद पुरवण्याचे काम संबंधित लोक करीत असल्याचा संशय यामध्ये व्यक्त करण्यात आला आहे. कराड आणि सातारा शहरामध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दंगल घडवण्याचा हेतू या संशयित व्यक्तींचा असल्याचे ही यामध्ये नमूद करण्यात आले आहे. या सर्व बाबींवर विचार करून संबंधितांना तात्काळ अटक करून या दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी निवेदनात करण्यात आली.
विक्रम पावसकर यांच्यावर खोटे आरोप
विक्रम पावसकर, अण्णा पावसकर सातत्याने सामाजिक कार्य करत आहेत. विक्रम पावसकर यांच्यावर जे खोटे आरोप केलेले आहेत. तरी त्या आरोपांची प्रशासनाने दखल घेवू नये. तसेच विक्रम पावसकर यांच्या केसाला धक्का बसला तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा हिंदू एकता आंदोलन समितीचे गणेश कापसे, महेश निकम व समितीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.