औरंगाबाद – दौलताबाद येथील किल्ल्याच्या मागे रसाईमाता मंदिराजवळ इतिहास संशोधकांना एक ऐतिहासिक तोफ आढळली आहे. इतिहास संशोधनाच्या उद्देशाने किल्ल्याच्या परिसरात भ्रमंती करत असलेल्या तीन तरुणांना मंदिराजवळील चौकोनी बुरुजावर ही तोफ दिसली. त्यानंतर त्यांनी या तोफेची माहिती पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. अधिकाऱ्यांनी या तोफेची पाहणी केली असून पुढील दोन दिवसात ही तोफ किल्ल्याच्या आवारात आणली जाईल, अशी माहिती देवगिरी किल्ल्याचे संरक्षण सहाय्यक संजय रोहणकर यांनी दिली.
दरम्यान, दौलताबाद किल्ल्याच्या परिसरात ज्या भागात ही तोफ सापडली. ती जागा पुरातत्त्व विभागाच्या जागेत नाही. तेथील भिंतींवर पूर्वी तोफा होत्या. त्या तोफा आमच्या विभागाने किल्ल्याच्या आवारत आणल्या होत्या. त्यातीलच ही एखादी तोफ असावी, असा अंदाज दौलताबाद किल्ला संरक्षक सहाय्यक संजय रोहनकर यांनी व्यक्त केला आहे.
शहरातील इतिहास संशोधनाचे काम करणारे शुभम पाटील, मयूर बाहेगव्हाणकर आणि सोन्याबापू भाडाईत हे तिघे शुक्रवारी सकाळी देवगिरी किल्ल्याच्या परिसरात गेले होते. किल्ल्याच्या मागील बाजूला असलेल्या रसाईमाता मंदिराजवळ चौकोनी बुरूज आहे. या बुरुजावर गवतात ही तोफ त्यांना आढळून आली. या तिनही तरुणांनी येथील गवत बाजूला सारून तोफेची पाहणी केली. फोटोही काढले. ही तोफ किल्ल्याच्या परिसरात आणली जाईल.