कराड | घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित चोरट्यास कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. त्याच्याकडून 1 लाख 18 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संबंधित चोरट्यास न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
संकेत उर्फ नरेंद्र संदीप कदम (वय 25, रा. गोवारे रोड, विद्यानगर, कराड) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, विंग (ता. कराड) येथील कृष्णा व्हॅली येथून बंगला फोडून 98 हजार रूपये किंमतीचा एलईडी टीव्ही तसेच 20 हजार रूपये किंमतीचा फ्रीज चोरीस गेला होता. 13 जून रोजी रात्री ही घटना घडली होती.
याबाबत डॉ. तुषार दोशी यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार कराड तालुका पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार पो.ना. सज्जन जगदाप, सचिन निकम, उत्तम कोळी, यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून संशयित संकेत कदम याला अटक केली. पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोर्हाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रणजित पाटील, पोलिनस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली. अधिक तपास सपोनि रेखा दुधभाते करत आहेत.