फलटण | हनी ट्रॅपद्वारे फलटण शहरातील एका भेंडी व्यापाऱ्यांकडून १५ लाख ५० हजार रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी एका मुलीसह सहा जणांवर फलटण शहर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, एक संशयित यापूर्वीच अन्य गुन्ह्यामध्ये अटकेत आहे.
पोलिसांनी दिलेली माहीती अशी, शहरातील एका भेंडी व्यापाऱ्यास १५ मे २०२० रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास अजित घोलप (रा. नागेश्वरनगर, चौधरवाडी, ता. फलटण) याने फलटण येथे भेंडीचा व्यापारी आला असून, ते भेंडी घेणार असल्याचे सांगितले. अजित दुचाकीवरून व्यापाऱ्याला घेऊन गेला. त्या ठिकाणी एक मुलगी, राजू बोके, मनोज हिप्परकर व रोहित भंडलकर हेही बसले होते. त्यांनी तेथे व्यापाऱ्यास मारहाण केली व त्याचे कपडे काढून त्याला मुलीच्या अंगावर ढकलून देत त्याचे फोटो काढले. तेथून गिरवीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ओढ्यात अजित घोलप व विजय गिरी गोसावी यांनी जबरदस्तीने व्यापाऱ्यास दुचाकीवर मध्ये बसवून घेऊन गेले. तेथे राजू बोके, मनोज हिप्परकर व रोहित भंडलकर हे दुचाकीवरून आले. त्या सर्वांनी मिळून भेंडी व्यापाऱ्यास दमदाटी व मारहाण केली. या वेळी रोहित भंडलकर याने व्यापाऱ्याच्या तोंडात लघुशंका केली.
पोलिस ठाण्यामध्ये जाऊन त्या मुलीस तुझ्याविरुद्ध बलात्काराची तक्रार द्यायला सांगतो, अशी भीती दाखवत व दमदाटी करीत २० लाख रुपयांची मागणी व्यापाऱ्याकडे करण्यात आली. अब्रूची बेअब्रु होईल, या भीतीने संबंधित व्यापाऱ्याने त्यांना १५ लाख ५० हजार रुपये दिले आहेत. पीडित व्यापाऱ्यास पोलिसांनी सुरक्षिततेची ग्वाही दिल्याने त्यांनी मुलीसह अन्य पाच जणांविरुद्ध फलटण शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. या प्रकरणी फलटण शहर पोलिसांनी मनोज हिप्परकर व विजय गिरीगोसावी यास अटक केली आहे. अन्य संशयित राजू बोके हा अन्य गुन्ह्यात यापूर्वीच अटकेत आहेत. या प्रकरणातील संशयित मुलीसह व अन्य संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत. याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक बनकर करीत आहेत.