कराड | कोळेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षिका श्रीमती शोभाताई अरुण चव्हाण यांना ‘रोटरी क्लब ऑफ मलकापूर’ यांच्या वतीने दिला जाणारा नेशन बिल्डर अवॉर्ड – 2022 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधत सोमवार दि. 12 सप्टेंबर रोजी हा शिक्षक सन्मान सोहळा संपन्न झाला. यावेळी मानाचा फेटा, शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र व शिल्ड असे देवून गाैरव करण्यात आला.
श्रीमती शोभाताई चव्हाण यांना शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्यासोबत नवोदय प्रवेश पात्र विद्यार्थी, विद्यार्थ्यांचा बौद्धिक -सामाजिक व सर्वांगीण केलेला विकास या त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. रोटरी क्लब ऑफ मलकापूरचे अध्यक्ष अरूण यादव व सचिव राजन वेळापूरे यांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. कराड पंचायत समितीचे माजी उपसभापती रमेश देशमुख, केंद्रप्रमुख सदाशिव आमणे, कोळे केंद्रप्रमुख श्रीम. मुसळे, मुख्याध्यापक श्री. शिनगारे आदी उपस्थित होते. कराड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सन्मती देशमाने, शिक्षण विस्तारअधिकारी जमिला मुलाणी यांनीही अभिनंदन केले.
श्रीमती शोभा चव्हाण म्हणाल्या, शिक्षण क्षेत्रात काम करण्यात एक समाधान मिळते. प्रत्येक शिक्षक विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्न करत असतो. सामाजिक संस्थांनी आमचा गाैरव करणे म्हणजे आम्हांला पुढील कार्यात काम करण्यास प्रोत्साहन देणे असते. आज शिक्षणात आमुलाग्र बदल घडत आहेत. या बदलात जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी टिकूनच नव्हे तर अग्रभागी असतो.