यंदा दिवाळीचा फराळ महागणार; घरगुती वस्तूंसोबत ड्राय फ्रूट्सच्या दरातही मोठी वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिवाळीला पाच ते सहा दिवस उरले आहेत . त्यामुळे प्रत्येकांच्या घरात फराळ करण्याची लगबग सुरु आहे. पण यावर्षी फराळासाठी लागणाऱ्या साहित्यांच्या किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, त्याचा परिणाम सर्वसामान्य जनतेवर होतोय. या महागाईमुळे नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे. म्हणजेच यंदाच्या दिवाळीत फटक्यासोबत महागाईचा आर्थिक फटका देखील फुटताना दिसणार आहे.

फराळासाठी साहित्यांच्या किमतीत वाढ

फराळ तयार करत असताना तेल, तूप, रवा, साखर, खोबरे यांचा मोठया प्रमाणात वापर होतो. त्यामुळे या आवश्यक साहित्याच्या किंमतीमध्ये 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच सुकामेव्याच्या किंमती 5 ते 10 टक्क्यांनी वाढलेल्या दिसत आहेत. याशिवाय काजू दरात मोठी वाढ झाली असून, घाऊक बाजारात याची किंमत 895 रुपये प्रति किलो आणि किरकोळ बाजारात 1100 रुपये प्रति किलोवर विकला जात आहे. चोरोळीचा दर 2500 रुपये प्रति किलो आहे तर वेलचीचे दर 3000 रुपये किलोवर पोहोचले आहेत. खजूर सध्या 200 रुपये किलोवर विकला जात असून, पिस्ता 1090 रुपये घाऊक आणि 1800 रुपये किलो किरकोळ बाजारात उपलब्ध आहे.

नागरिकांच्या खिशाला फटका

मनुके देखील महागले असून घाऊक बाजारात 200 रुपये आणि किरकोळ बाजारात 300 रुपये किलोने विकले जात आहेत. यामुळे फराळाचे साहित्य खरेदी करताना सामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. त्यामुळे अनेक लोकांची खरेदीबाबत चिंता वाढली आहे. या वाढत्या दरांमुळे दिवाळीच्या सणासाठी आवश्यक साहित्य खरेदी करताना लोकांना विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागत आहे. खासकरून मिठाईच्या तुलनेत सुख्या मेव्याचे गिफ्ट बॉक्स महाग झाले असून त्यांची किंमत 500 रुपयांपासून सुरू होत आहे. त्यामुळे खर्चात मोठी वाढ दिसून येत आहे.