हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जन्मदिनानिमित्त मविप्र संस्थेतर्फे समाज दिन साजरी करण्यात आला. या दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली होती. यावेळी बोलताना त्यांनी, सरस्वती किंवा शारदा देवींनी किती शाळा काढल्या, त्यांनी किती लोकांना शिक्षण दिले? असा सवाल उपस्थित केला. त्याचबरोबर, “सामान्यांना शिक्षणाचा अधिकार महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराजांनी मिळवून दिला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचा कायदा करून साऱ्यांनाच शिक्षणाचे कवाडे उघडी केली. त्यामुळे तेच माझे दैवत आहेत” असे भुजबळ यांनी म्हणले.
या कार्यक्रमांमध्ये बोलताना, छगन भुजबळ यांनी आपला देवांना विरोध नाही, ज्यांना पुजा करायची त्यांनी करावी. मी मात्र माझ्या दैवतांचेच पूजन करणार असे सांगितले. इतकेच नव्हे तर, यावेळी त्यांनी ब्राह्मणी व्यवस्थेवर देखील भाष्य केले. “दोनशे वर्षापुर्वी दिड टक्के ब्राह्मणांच्या ताब्यात शिक्षण व्यवस्था होती. महिलांना देखील शिकण्यास बंदी होती. अन्य समाज सारा अशिक्षीत. त्यामुळे त्यांचे हक्क काय, अधिकार काय कोणालाच ठावूक नव्हते. तक्रार तरी कोणाकडे करायची?” असे त्यांनी म्हटले.
पुढे बोलताना, “त्या काळात असे वातावरण असताना, महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंनी बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारे उघडली. त्यात शाहू महाराजांनी पुढाकार घेतला व आपले सर्वस्व अर्पण केले. अशा व्यक्तींच्या फोटोंचे पुजन झाले पाहिजे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचा कायदा करून साऱ्यांनाच शिक्षणाचे कवाडे उघडी केली. त्यामुळे मी कुठेही गेलो तरी त्यांचे विचार सोडणार नाही” असे देखील छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.