कायद्याचं बोला #5 | अॅड. स्नेहल जाधव
तुम्ही बऱ्याचदा जमिनीसंदर्भात बोलताना फेरफार हा शब्द ऐकला असेलच. तर फेरफार नमुन्यात जमिनीची खरेदी-विक्री, वारस नोंदी, शेतजमिनीवर बोजा लावणं अशा बदलांची सविस्तर माहिती दिलेली असते. पण तो काढायला झंजटी फार असतात बुवा! हो ना?… पण आता या फेरफार नोंदीची माहिती तुम्हाला घरबसल्या ऑनलाईन पाहता येणार आहे हे तुम्हाला माहित आहे का! त्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागानं ‘आपली चावडी’ ही प्रणाली विकसित केली आहे. चला तर मग फेरफार ऑनलाईन कसा पाहायचा ते पाहूया…
१) फेरफार ऑनलाईन पाहण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला गुगलवर bhulekh.mahabhumi.gov.in असं सर्च करायचं आहे.
२) त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल. या वेबसाईटवर उजवीकडे आपली चावडी नावाचा पर्याय तुम्हाला दिसेल.
त्यावर क्लिक केल्यास आपली चावडी (Digital Notice Board) नावाचं एक नवीन पेज तुमच्यासमोर उघडेल.
आता तुमच्या गावातील फेरफार नोंदी कशा जाणून घ्यायच्या ते पाहूया.
३) या पेजवर ‘जिल्हा निवडा’ हा पर्याय आहे. त्याखालील जिल्हा या रकान्यासमोर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे, तालुका या रकान्यासमोर तालुका निवडायचा आहे, तर गावाच्या रकान्यासमोर गावाचं नाव निवडायचं आहे.
४) ही माहिती भरून झाली की “आपली चावडी पहा” या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर त्या गावातील फेरफाराच्या नोंदी ओपन होतील.
यामध्ये तुम्ही पाहू शकता की, फेरफार नंबर सुरुवातीला दिलेला असतो. त्यानंतर फेरफाराचा प्रकार म्हणजे ‘शेतमजिनीवर बोजा चढवला किंवा कमी केला आहे काय?’, ‘वारस नोंद केली आहे काय?’, ‘जमीन खरेदी केली आहे काय?’, याप्रमाणे प्रकार नोंदवलेला असतो. त्यापुढे फेरफाराचा दिनांक, हरकत नोंदवण्याचे शेवटची तारीख आणि ज्या सर्वे किंवा गट क्रमांकशी संबंधित जमिनीचा व्यवहार झाला आहे तो सर्वे किंवा गट क्रमांक यांची माहिती दिलेली असते.
५) यानंतर सगळ्यात शेवटी ‘पहा’ हा पर्याय तिथं दिलेला असतो. ‘पहा’ या पर्यायावर क्लिक केल्यास तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.
गाव नमुना ९ म्हणजेच फेरफाराची नोटीस असं या पेजचं शीर्षक आहे.
यामध्ये सुरुवातीला तालुक्याचं नाव आणि त्यापुढे गावाचं नाव नमूद केलेलं असतं. आता ही फेरफार नोटीस तीन रकान्यांत विभागलेला आहे.
यातील पहिल्या रकान्यात फेरफाराचा क्रमांक दिलेला असतो. त्यानंतर दुसऱ्या रकान्यात जमीन संपादित केलेल्या अधिकाराचं स्वरूप सांगितलेलं असतं. यामध्ये जमिनीच्या कोणत्या प्रकारच्या व्यवहार झाला आणि तो कोणाकोणात झाला, याविषयीची सविस्तर माहिती दिलेली असते.
६) त्यानंतर तिसऱ्या रकान्यात ज्या शेतजमिनीवरील अधिकार संपादित केले आहे, त्या शेतजमिनीचा गट क्रमांक दिलेला असतो.
७) त्यानंतर त्याखाली या फेरफार नोंदीशी संबंधित काही हरकत असल्यास ती स्थानिक तलाठ्याकडे १५ दिवसांच्या आत कळवावी, अन्यथा तुमची कोणतीही हरकत नाही, असं समजलं जाईल, अशी सूचना तिथं दिलेली असते.
तर अशी पहायची आहे ऑनलाईन फेरफार नोंदीची माहिती!
– अॅड. स्नेहल जाधव
(लेखिका व्यवसायाने वकिल असून त्या कायदादूत संस्थेच्या संस्थापक आहेत)