मुंबई प्रतिनिधी। कयार आणि महा या दोन चक्रीवादळांचा महाराष्ट्रासह इतर राज्यांना देखील मोठा फटका बसला. याचा परिणाम शेती मालांवर प्रामुख्याने शेतकऱ्यांवर झाला. घाऊक बाजारामध्ये आवक कमी झाल्यामुळे पालेभाज्यांसहित, फळभाज्यादेखील महागल्या.
हळूहळू अवकाळी पावसाने केलेल्या नुकसानीतून शेतकरी, नागरिक सावरत असताना आणि सर्वत्र थंडीची चाहूल सुरू असताना, पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रात आणि दक्षिण पश्चिम अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या प्रभावी क्षेत्राचे रूपांतर गुरुवारी दुपापर्यंत चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या २४ तासांत अरबी समुद्रात एकाच वेळी दोन चक्रीवादळे निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पवन आणि अम्फन अशी या वादळांना नावे देण्यात आली आहेत. या चक्रीवादळांमुळे महाराष्ट्रातील मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, गोवा आणि दक्षिण गुजरातच्या विविध भागांत येत्या २४ तासांत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान या काळात किनारपट्टीवर ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुरुवारी मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.