सातारा | कोरेगाव तालुक्यातील वडाचीवाडी हद्दीतील एका पोल्ट्रीवर काम करणाऱ्या मजूराचा प्रेमसंबधातून खून झाल्याची घटना घडली आहे. पत्नीच्या प्रियकराचा पतीने डोक्यात दगड घालून खून केला असून आरोपी फरार आहे. कराड तालुक्यातील साळशिरंबे येथील पती-पत्नीसोबत राहणाऱ्या प्रियकरांचा डोक्यात दगड घालून मध्यरात्री खून केल्याची घटना घडली आहे. विकास बबन मोरे असे मृताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगल लखन मोरे (मूळ रा. साळशिरंबे, ता. कराड, सध्या रा. वडाचीवाडी, ता. कोरेगाव) यांनी जबाब दिला आहे. वडाचीवाडी येथे विकास बबन मोरे यांच्यासोबत मागील आठ ते नऊ महिन्यांपासून मी मंगल मोरे राहायला आहे. माझे लग्न लखन ईश्वर मोरे (रा. साळशिरंबे, ता. कराड) याचेशी २० वर्षांपूर्वी झाले असून मला चार मुले आहेत. माझा नवरा साळशिरंबे येथे दारू पिऊन मला मारहाण करीत असे.
दरम्यान, माझे व विकास यांचे प्रेमसंबंध जुळल्याने मी विकास यांच्यासोबत मागील आठ ते नऊ महिन्यांपासून कामासाठी वडाचीवाडी हद्दीतील एका पोल्ट्रीवर राहायला आहे. एक महिन्यापूर्वी माझा नवरा लखन मोरे हा माझ्या दोन मुलींना घेऊन वडाचीवाडी येथे आमच्याकडे पोल्ट्रीवर राहायला आला. तो एक महिन्यापासून मला व विकासला ‘तुमच्या डोक्यात दगड घालून मारून टाकेन,’ तसेच मुली काजल व प्रियांका यांना ‘तुमचा गळा कापीन’, अशा धमक्या देत असे. तो आमच्यासोबत राहून भंगार गोळा करून विकत असे.
काल दुपारी लखन हा भंगाराचे काम करून घरी जेवायला आला. तेव्हा तो दारू पिला होता. त्या वेळी ‘कोयत्याने तुला जिवे मारीन’, अशी धमकी देऊन पुन्हा भंगार गोळा करायला निघून गेला आणि सायंकाळी सहाच्या सुमारास घरी आला. त्यानंतर सातच्या सुमारास मी, लखन, विकास आणि मुली काजल व प्रियांका अशा सर्वांनी एकत्र जेवण केले. त्यानंतर लखन माझ्या दोन मुली पोल्ट्रीच्या बाजूच्या आमच्या खोलीत झोपले. मी आणि विकास खोलीच्या बाहेर मोकळ्या जागेत झोपलो. रात्री बाराच्या सुमारास मला लखनच्या ओरडण्याचा आवाज आला. मी डोळे उघडून पाहिले असता, लखन हातात दगड घेऊन उभा होता. त्याने तो दगड विकास यांच्या डोक्यात मारला व पळून गेला.
यावेळी पोल्ट्री फार्मचे मालकांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर रुग्णवाहिका बोलावली. विकास याला सातारा येथे रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, विकासचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर डीवायएसपी गणेश किंद्रे, पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, उपनिरीक्षक विशाल कदम, सहाय्यक उपनिरीक्षक विजय जाधव, पोलीस नाईक अमोल सपकाळ यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
घटनेचा पंचनामा केल्यानंतर लखन मोरे याच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी सकाळी पोलीस मुख्यालयातून आलेल्या श्वान पथकाने लखन याचा माग काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आले नाही. सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी पाहणी करुन संशयित आरोपी लखन मोरे याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.