मुंबई । नागपूरात २ मुलांसह पती-पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीने गळफास लावून आत्महत्या केली तर पती आणि दोन मुलांचा मृतदेह बेडवर आढळले. पती धीरज राणे,पत्नी सुषमा राणे 11 वर्षीय मुलगा ध्रुव आणि 5 वर्षाची मुलगी लावण्या अशी मयतांची नावे आहे. दुपारी १ ते दीडच्या सुमारास हा प्रकार उघडकीस झाला आहे. घटनास्थळी एक सुसाईड नोट आढळली असल्याची माहिती मिळत आहे.
पोलीस उपायुक्त, निलोत्पल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबातील महिलेने वेगळ्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली आहे. तर कुटुंबातील इतर तिघाजणांचे मृतदेह हे वेगळ्या खोलीत बेडवर आढळले. यासोबतच सुसाईड नोट देखील मिळाली आहे. मात्र पोस्टमार्टम झाल्याशिवाय याबाबत कोणतीही माहिती दिली जाणार नाही, असं देखील ते म्हणाले. या प्रकरणाचा पुढील तपास कोराडी पोलीस करत आहे.
मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, राणे कुटूंब त्यांच्या आईसह नागपूरमधील कोराडी नजीक ओम नगर येथे राहते. सुषमा राणे डॉक्टर होत्या तर धीरज नामांकित कॉलेजमध्ये लेक्चरर होते. धीरज राणे आणि त्यांची पत्नी आज सकाळी उशिरापर्यंत उठले नाही म्हणून त्यांच्या आत्या, आईने आवाज दिले. त्यावेळी धीरज यांची पत्नी सुषमा त्यांच्याशी बोलल्या. मात्र, त्यानंतर दुपारी एकच्या सुमारास सुषमा यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. तर पती धीरज आणि दोन मुलं बेडवर मृतावस्थेत आढळले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”