हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशातील हापूर येथून नवी दिल्लीस जात असताना एआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर हापूरमध्ये गोळीबार करण्यात आला. यानंतर त्यांच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी रविवारी हैदराबादच्या बाग-ए-जहानारा येथे एका व्यावसायिकाने 101 बकऱ्यांचा बळी देण्याचा धक्कादायक प्रक्रार घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, हैदराबादच्या बाग-ए-जहानारा येथे एका व्यावसायिकाने एआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या दीर्घायुष्यासाठी आज एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमास मलाकपेटचे आमदार आणि एआयएमआयएम नेते अहमद बलाला यांनीही उपस्थिती लावली होती.
दरम्यान, ३ फेब्रुवारीच्या हल्ल्यानंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनचे प्रमुख ओवेसी यांचे समर्थकांकडून त्यांच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जात आहे. या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने देखील असदुद्दीन ओवेसी यांना झेड श्रेणीची सुरक्षा मंजूर केली होती. मात्र, त्यांनी ती फेटाळून लावली. दरम्यान, आज हैदराबादच्या बाग-ए-जहानारा येथे एका व्यावसायिकाने १०१ बकऱ्यांचा बळी देण्याचा धक्कादायक प्रक्रार केला आहे.