कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कायदेशीर तरतुदींच्या अधिन राहुन काम करणे हे माझे कर्तव्य आहे. नगराध्यक्षांनी 2 तारखेला जी सभा आयोजित केली होती, त्या सभेला मी उपस्थित होते. परंतु त्या नंतर 3 तारखेची सभा ही नियमबाहय असल्याने मी त्या सभेला उपस्थित राहीले नाही. या संदर्भात मी नगराध्यक्षांना पुर्व कल्पना दिली होती. 3 तारखेला नियमबाहय सभेत माझेवर कोणी टिका केली, त्याला मी किंमत देत नाही. त्या टिकेची दखल घेण्याची देखील आवश्यक्ता मला वाटत नाही, अशी प्रतिक्रिया पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
नगराध्यक्षा स्वप्नालि शिंदे यांनी 2 जुन रोजी आयोजित केलेली सर्वसाधारण सभा ही कोरम अभावी तहकुब करण्यात आली. सदरची सभा तहकुब करता येत नाही, ती रद्द्च करावी लागेल अशी सुचना मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी नगराध्यक्षांना केली होती. परंतु नगराध्यक्षांनी मुख्याधिकारी यांच्या सुचनेकडे दुर्लक्ष करून सभा तहकुब करून तीच सभा 3 जुन रोजी घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले. नगराध्यक्षांनी घेतलेला हा निर्णय नियमबाहय होता. त्यामुळे मुख्याधिकारी यांनी नगराध्यक्षांना पत्र देवुन आपण 3 जुन रोजीच्या सर्वसाधारण सभेला उपस्थित राहणार नाही, असे मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी कळविले होते. 3 जुन रोजीच्या सभेला केवळ तीन नगरसेवक उपस्थित होते, याच सभेत नगराध्यक्षांचे पती नगरसेवक कुमार शिंदे यांनी मुख्याधिकारी यांना लक्ष करून त्यांच्यावर टिका केली. या संदर्भात मुख्याधिकारी यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी अशा टिकांची दखल घेण्याची गरज वाटत नाही. मी कोणत्याही कायदेशीर तरतुदींचा भंग केलेला नाही. भंग जर कोणी केला असेल तर तो नगराध्यक्षांनी केला आहे. नियमबाहय सभेला उपस्थित राहणे मला बंधनकारक नाही, अशी प्रतिक्रिया मुख्याधिकारी यांनी व्यक्त केली.
शहरातील मागील काही महीन्यांचे राजकारण पाहता पालिकेतील 13 नगरसेवकांनी एकत्र येवुन विरोधी गट तयार केल्याने सत्ताधारी गट हा अल्पमतात आला आहे. सत्ताधारी गटात केवळ चार नगरसेवक उरले आहेत, चार नगरसेवकांना बरोबर घेवुन पालिकेचा कारभार करणे कठीण होवुन बसले आहे. अशातच पालिकेतील मुख्याधिकारी या कायदेशीर कामालाच पाठींबा देतात, त्यामुळे सत्ताधारी गटाची मोठी अडचण होवुन बसली आहे. राजकारणातील या उलथापालथीमुळे सत्ताधारी गटात नैराश्याचे वातावरण पसरले असल्याने कधी पत्रकारांवर तर कधी मुख्याधिकारी यांचेवर टिका करून त्यांना लक्ष केले जाते, अशी प्रतिक्रिया शहरातुन व्यक्त केली जात आहे.