मी एकटा पडलोय, जात संकटात आहे, एकजूट व्हा; मनोज जरांगे पाटलांचे आवाहन

manoj jarange patil
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मला आणि माझ्या समाजाला घेरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. आम्ही जी सत्य मागणी केली ती अनेकांना रुचलेली नाहीये. मी एकटा पडलोय. एकीकडे ओबीसी नेते त्यांच्या आरक्षणासाठी एकवटले असताना मराठा समाजातील नेते मात्र गप्प आहेत. मराठ्यांचे नेते मतांचा विचार करतात आरक्षणाचा नाही असं म्हणत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी खंत व्यक्त केली. तसेच आपली जात संकटात आहे, एकजूट व्हा असं आवाहन सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवाना केलं आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यावर गोरगरीब मराठ्यांची लेकरं मोठी होतील, ते मोठे अधिकारी होतील, अशी भीती सगळ्यांना वाटते. त्यामुळे मी आरक्षणाच्या बाजूने उभं राहू नये म्हणून सगळ्यांनी मला घेरले आहे. मी एकटा पडलो आहे. सत्ताधारी पक्षातील मराठे नेते माझ्या बाजूने बोलत नाही, त्यांनी मला उघडं पाडलं आहे. पण मराठा समाजाने एकजूट राहावे अशी विनंती मनोज जरांगे यांनी केली. कायद्याने मराठ्यांना आरक्षण दिलं आहे. मराठा हा कुणबी असल्याच्या सरकारी नोंदी आहेत. मी नेमकं महत्त्वाच्या विषयावर बोट ठेवल्याने सगळ्यांना पोटदुखी होऊ लागली असं जरांगे पाटलांनी सांगितलं.

मराठा नेत्यांवर हल्लाबोल –

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले, मराठा समाजाच्या नेत्यांनी फक्त निवडून येण्यापेक्षा किंवा आपल्या पदाची चिंता करण्यापेक्षा जातीचं आरक्षण महत्त्वाचं आहे, ही गोष्ट लक्षात घ्यावी. ओबीसी समाजाच्या नेत्यांनी ही गोष्ट सिद्ध करुन दाखवली आहे. ओबीसी नेत्यांसाठी निवडणुकीपेक्षा जातीचं आरक्षण महत्त्वाचे आहे, हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे आता आपली जात संकटात सापडली आहे. मराठा समाजाला आवाहन आहे की, 6 ते 13 जुलैपर्यंत होणाऱ्या शांतता जनजागृती रॅलीला मोठ्या संख्येने उपस्थित राहा. आपल्या डोळ्यांदेखत लेकरांचं वाटोळं होऊन देऊ नका असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.