हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसने जगभर थैमान घातलेलं असताना यापासून बचावासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करणं आता सुरु आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीसुद्धा स्वतःची तपासणी केली असून सुदैवाने त्यांना कोरोनाची लागण झालेली नाही.
अमेरिकेत कोरोनासंदर्भातील तपासण्या मोफत केल्या जाणार असून लवकरच आम्ही यावर नियंत्रण मिळवू असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. ट्रम्प यांनी ब्राझीलचे राष्ट्रपती जेअर बोलसोनारो आणि त्यांच्यासोबतचे अधिकारी फॅबियो वाजगार्टन यांची फ्लोरिडामध्ये भेट घेतली होती. यानंतर वाजगार्टन यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ट्रम्प यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: आपल्या कोरोना चाचणीची माहिती एका पत्रकार परिषदेत दिली होती. माझ्यात कोरोनाची कोणतीही लक्षणं दिसत नाही, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत. अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.